शैक्षणिक

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एकता पदयात्रेचे यशस्वी आयोजन

150th birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel


By nisha patil - 8/11/2025 11:01:41 AM
Share This News:



कोल्हापूर, दि. ०८ : कोल्हापूर शहरात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘सरदार@१५० एकता पदयात्रेचे’ (युनिटी मार्च) यशस्वी आयोजन करण्यात आले. जिल्हा पोलीस परेड क्रीडांगणावरून सुरू झालेल्या या एकता पदयात्रेला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, जिल्हा युवा अधिकारी स्वप्निल देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, प्राचार्य डॉ. युवराज गुरव आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते. उपस्थितांना डॉ. युवराज गुरव यांनी एक भारत श्रेष्ठ भारत व नशामुक्त भारत बाबत शपथ दिली. 

या उपक्रमात शहरातील शाळा, महाविद्यालये, स्थानिक युवा संघटना, माय भारत, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक आणि बीएसजी युनिट्स यांचा प्रमुख सहभाग होता. उपस्थित सहभागींना मार्गदर्शन करताना अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी “एक भारत श्रेष्ठ भारत” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवूया, असे आवाहन केले. ते म्हणाले की, या पदयात्रेतून युवकांमार्फत एकतेचा संदेश दिला जात आहे, तसेच या अभियानांतर्गत विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात “मेरा युवा भारत, कोल्हापूर (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार)”च्या माध्यमातून २०२५ हे वर्ष भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ३१ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान संपूर्ण भारतभर जिल्हास्तरीय एकता पदयात्रा आयोजित केल्या जात आहेत.

आज कोल्हापूर शहरात ही पदयात्रा आयोजित केली होती, तर उद्या इचलकरंजी शहरात अशाच प्रकारची पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्यासोबत अभियानाच्या कालावधीत स्वच्छता मोहीम, स्वदेशी मेळे, व्यसनमुक्ती मोहीम, सरदार पटेल यांच्या विचारांवर चर्चासत्रे, वादविवाद स्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

ही एकता पदयात्रा सकाळी ७.३० वाजता परेड ग्राउंड येथून सुरू झाली. त्यानंतर धैर्यप्रसाद चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय, आणि त्याच मार्गाने परत येत पोलीस परेड ग्राउंड, कोल्हापूर येथे या पदयात्रेचा समारोप झाला. पदयात्रा सुरू होण्यापूर्वी देशभक्तीपर गीतांवर उमेश चौगुले आणि ग्रुपने नृत्य सादर करण्यात आले. तसेच यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी माहिती देणारा पोवाडा आजाद नायकवडी यांनी सादर केला.

 


सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एकता पदयात्रेचे यशस्वी आयोजन
Total Views: 24