बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यात आता लोकसभेचे ३ खासदार?
By nisha patil - 11/28/2026 2:13:42 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यात आता लोकसभेचे ३ खासदार?
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय नकाशात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या असलेले लोकसभेचे दोन मतदारसंघ वाढून तीन होणार, तर विधानसभेच्या मतदारसंघांची संख्या १० वरून थेट १४ पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर या चर्चेला वेग आला आहे. सध्या कोल्हापूर आणि हातकणंगले असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. मात्र, आगामी पुनर्रचनेनंतर जिल्ह्यातील मतदारसंघांची रचना बदलू शकते. प्रस्तावित शक्यतेनुसार, कोल्हापूर शहर, करवीर, गगनबावडा आणि पन्हाळा परिसराचा मिळून पहिला लोकसभा मतदारसंघ होऊ शकतो. तर कागल, आजरा, गडहिंग्लज, चंदगड आणि राधानगरी परिसराचा दुसरा मतदारसंघ तयार होण्याची शक्यता आहे.
याशिवाय हातकणंगले, शिरोळ आणि शाहूवाडी यांच्यासह सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश असलेला तिसरा लोकसभा मतदारसंघ निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे, यापूर्वीची मतदारसंघ रचना २००१ च्या जनगणनेवर आधारित होती. आता प्रस्तावित पुनर्रचना २०२७ च्या जनगणनेच्या आधारे होणार असून त्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ पुनर्रचना आयोग स्थापन केला जाणार आहे. मात्र, ही सध्याची संभाव्य रचना असून अंतिम निर्णय आयोगाच्या सूत्रानुसारच होणार आहे. त्यामुळे आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्याला दोनऐवजी तीन खासदार आणि विधानसभेतही अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आता लोकसभेचे ३ खासदार?
|