बातम्या
३ दिवस ओढ्यात मृत्यूशी झुंज! पन्हाळा पोलिसांच्या धाडसाने वाचला जीव!
By nisha patil - 11/19/2026 3:15:45 PM
Share This News:
३ दिवस ओढ्यात मृत्यूशी झुंज! पन्हाळा पोलिसांच्या धाडसाने वाचला जीव!
प्रतिनिधी शाहबाज मुजावर पन्हाळा तालुक्यातील पडवळवाडी येथे ओढ्यात गेल्या तीन दिवसांपासून पडून असलेल्या एका अज्ञात व्यक्तीला पन्हाळा पोलिसांच्या तत्परतेने आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जीवदान मिळाले. पोलिस आणि नागरिकांनी दाखवलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पडवळवाडी येथील नलवडे बंगल्याजवळील ओढ्यामध्ये एक अज्ञात इसम गेल्या तीन दिवसांपासून पडून असल्याचे ग्रामस्थ पंडित नलवडे यांच्या निदर्शनास आले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता डायल ११२ वर संपर्क साधत पोलिसांना घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार निलेश पडवळ, अजिंक्य जाधव आणि गणेश पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच रुग्णवाहिकेलाही पाचारण करण्यात आले. यावेळी डॉ. आदित्य संगमकर, अशोक काळगावकर, अजित चौगुले आणि ऋषिकेश आप्पासो कांबळे (दोघेही रा. राजेंद्रनगर) यांनी पोलिसांना मदत केली. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांतून ओढ्यातील पाण्यात पडलेल्या त्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर), कोल्हापूर येथे पाठविण्यात आले.
पोलिसांची समयसूचकता, ग्रामस्थांचा सतर्कपणा आणि नागरिकांनी दाखवलेली माणुसकी यामुळे एका अनोळखी व्यक्तीला नवजीवन मिळाले. या कौतुकास्पद बचावकार्याचे परिसरातून अभिनंदन होत आहे.
३ दिवस ओढ्यात मृत्यूशी झुंज! पन्हाळा पोलिसांच्या धाडसाने वाचला जीव!
|