बातम्या

३ वर्षांच्या श्रीशाचा विक्रम! ४० गडकोट सर करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद!

3 year old Srisha record


By nisha patil - 11/14/2026 3:06:25 PM
Share This News:



३ वर्षांच्या श्रीशाचा विक्रम! ४० गडकोट सर करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद!

 

मूर्ती लहान, पण कीर्ती महान! वय अवघं तीन वर्षं... पण आतापर्यंत तब्बल ४० गडकोट सर करण्याची कामगिरी! कोल्हापूर जिल्ह्यातील या चिमुकल्या गिर्यारोहकाची थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. श्रीशा पाटील असं या अवघ्या तीन वर्षांच्या धाडसी चिमुरडीचं नाव! कोल्हापूर जिल्ह्यातील आत्याळ गावची लेक आणि माजी सैनिक शिवाजी पाटील यांची नात असलेल्या कुमारी श्रीशा शीतल जयदीप पाटील हिने आपल्या जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.

श्रीशाने वयाच्या अवघ्या दीड वर्षापासून आई-वडिलांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोट मोहिमांना सुरुवात केली. वयाच्या दुसऱ्या वर्षी तिने रायगड सर केला. तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध हरिश्चंद्रगड आणि कोकणकड्यावरही तिने भगवा ध्वज फडकवला. आतापर्यंत श्रीशाने रायगड, राजगड, प्रतापगड, सिंहगड, शिवनेरी, पन्हाळा, पारगड, भुदरगड, लोहगड यांसह तब्बल ४० गडकोट मोहिमा पूर्ण केल्या आहेत. कोरीगड ट्रेक करणारी भारतातील सर्वात लहान बाल गिर्यारोहक म्हणूनही तिची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

तिच्या या कामगिरीसाठी सह्याद्री रत्न बाल गिर्यारोहक पुरस्कार, राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्कार यांसह अनेक सन्मानांनी तिला गौरवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, गड सर करताना शिवरायांच्या घोषणा आणि गाणी म्हणत श्रीशाचा उत्साह आणखी वाढतो. आता स्वराज्यातील तब्बल ३५० गडकोट सर करण्याचा तिचा संकल्प आहे. वय लहान असलं तरी स्वप्न मोठं असू शकतं, याचा आदर्श घालून देणाऱ्या या चिमुकल्या श्रीशाच्या जिद्दीला आणि कर्तृत्वाला मानाचा मुजरा.


३ वर्षांच्या श्रीशाचा विक्रम! ४० गडकोट सर करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद!
Total Views: 15