बातम्या
आजऱ्याला मलिग्रेमधून '३३ केव्ही'चा 12 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वीजपुरवठा
By nisha patil - 10/6/2026 5:30:32 PM
Share This News:
**आजऱ्याला मलिग्रेमधून '३३ केव्ही'चा 12 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वीजपुरवठा*
आजरा(हसन तकीलदार)*: आजऱ्याला मुमेवाडी येथून ३३ के.व्ही. लाईनने होणारा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत होता.हा विजपुरवठा जंगल भागातून असल्याने वादळी वारा, पाऊस, झाडे पडून यामुळे वारंवार खंडित होत असे आणि रात्री अपरात्री दुरुस्ती करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असे.
जंगलातील रानटी जनावरे, श्वापदे, विषारी साप आदींची भीती असे.त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून मलिग्रे येथून ३३ के.व्ही. लाईन आजरा सबस्टेशनला जोडून विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे. १२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आजरेकरांना वीज वितरण कंपनीने ही व्यवस्था करून दिली आहे. मलिग्रे सबस्टेशनमध्ये मंगळवारी ३३ के.व्ही. लाईन व्यवस्थेचे उद्घाटन बटन दाबून कार्यकारी अभियंता एस. के. पोवार यांच्या हस्ते झाले.
आजरा शहराबरोबर गवसे व आंबोली सबस्टेशनला मुमेवाडी येथून ३३ केव्ही लाईनने विद्युत पुरवठा गेल्या अनेक वर्षापासून सुरू होता. मात्र, हा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत होता. मागील महिन्यात ऐन उकाड्यात सलग दोन रात्री आजरा शहराचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वीज वितरणचे कार्यकारी अभियंता एस. के. पोवार यांनी तातडीने मलिग्रे येथून ३३ के.व्ही. लाईनने आजऱ्याला विद्युत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे वीज वितरणचे मलिग्रे (ता. आजरा) येथील सबस्टेशनमधून आलेल्या ३३ के.व्ही. लाईनचे उद्घाटन कार्यकारी अभियंता एस. के. पोवार यांनी बटन दाबून केले. यावेळी नागेश बसरकट्टी, कृष्णा कोळी यांसह कर्मचारी उपस्थित होते.
गेले महिनाभर वीज पुरवठा अधिकारी व कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केल्यानंतर अखेर मंगळवारी मलिग्रे येथून आजऱ्याला जाणाऱ्या ३३ के.व्ही. लाईनचा प्रारंभ कार्यकारी अभियंता पोवार यांच्या हस्ते झाला. यावेळी उपकार्यकारी अभियंता नागेश बसरकट्टी, सहायक अभियंता कृष्णा कोळी, लाईनमन संतोष डोंगरे, बाळकृष्ण कडुकर, सर्व लाईन स्टाफ, आजरा तालुक्यातील वीज वितरणचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.यामुळे आजरेकरात समाधान व्यक्त केले जात आहे.मुमेवाडी येथील 33के. व्ही. च्या सतत खंडित होणाऱ्या विजेपासून आता जनतेची सुटका होईल अशी आशा आहे.
आजऱ्याला मलिग्रेमधून '३३ केव्ही'चा 12 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वीजपुरवठा
|