बातम्या

रविवार पेठेत ४१ झाडांची विनापरवाना तोड; ४१ हजारांचा दंड

41 trees cut down without permission in Ravivar Peth


By nisha patil - 2/11/2026 11:49:48 PM
Share This News:



रविवार पेठेत ४१ झाडांची विनापरवाना तोड; ४१ हजारांचा दंड

 रास्ता रोको आंदोलनातून उच्चस्तरीय चौकशीसह दोषींवर कठोर कारवाईची मागणी

पन्हाळा प्रतिनिधी : शहाबाज मुजावर ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या रविवार पेठ येथे ४१ झाडांची विनापरवाना तोड झाल्याचे वनविभागाच्या पत्रातून स्पष्ट झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि. २ नोव्हेंबर) पन्हाळा प्रवासी कर नाक्यावर श्रीकांत कांबळे (आप्पा) यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वृक्षतोडीची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
     

परिक्षेत्र वनाधिकारी, पन्हाळा यांनी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी तहसीलदारांना पाठविलेल्या पत्रानुसार, जुन्या सर्व्हे क्रमांक ४५, नवीन सर्व्हे क्रमांक २८ आणि ग्रामपंचायत मिळकत क्रमांक १४२ मधील आंबा, जांभूळ, साग, फणस, कुंकुफळ, लिंबू, करंज आणि शिसम अशा विविध प्रजातींच्या एकूण ४१ झाडांची विनापरवाना तोड झाल्याचे नमूद केले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल (वृक्षतोडीचे विनियमन इ.) अधिनियमानुसार प्रति झाड एक हजार रुपये याप्रमाणे ४१ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून वसुलीची कार्यवाही सुरू आहे.
     

मात्र, केवळ दंड आकारून प्रकरण संपवू नये. वृक्षतोडीस परवानगी होती का, प्रत्यक्ष वृक्षतोड कोणी केली आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याची सखोल चौकशी करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
         

पन्हाळगडाचा ऐतिहासिक वारसा, जैवविविधता आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
       

यावेळी माजी उपनगराध्यक्ष चेतन भोसले, फराह झांजी, शरमीन मुजावर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रविवार पेठेत ४१ झाडांची विनापरवाना तोड; ४१ हजारांचा दंड
Total Views: 9