बातम्या

गोकुळ निवडणुकीत २५ जागांसाठी ४३६ अर्ज; आज उमेदवारी अर्जांची छाननी

436 nominations filed for 25 seats in Gokul election


By nisha patil - 9/23/2026 4:41:39 PM
Share This News:



गोकुळ निवडणुकीत २५ जागांसाठी ४३६ अर्ज; आज उमेदवारी अर्जांची छाननी

 

जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. २५ संचालक पदांच्या जागांसाठी तब्बल ३०१ इच्छुकांनी ४३६ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शेवटच्या दिवशी ८२ इच्छुकांनी ११५ अर्ज दाखल केले. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात दिवसभर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, बहुतांश इच्छुकांनी यापूर्वीच अर्ज दाखल केल्याने शेवटच्या दिवशी फारशी गर्दी झाली नाही. त्यामुळे परिसरात शांतता होती.  

शेवटच्या दिवशी माजी संचालक मुरलीधर जाधव यांच्यासह ८२ इच्छुकांनी अर्ज दाखल केले. माजी संचालक बयाजी शेळके तसेच डॉ. सुजित मिणचेकर यांनीही दुबार अर्ज दाखल केला. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

काल दाखल झालेल्या अर्जांमध्ये सुनील शिंत्रे, सुयेशा घाटगे, अभिषेक शिंपी, अरुण इंगवले, राहुल पाटील, तेजस्विनी पाटील, दत्तात्रय उगले, एकनाथ पाटील, धीरज डोंगळे, गंगाधर व्हसकोटी, रामचंद्र डांगे, उज्ज्वला उल्हास पाटील, स्निग्धा चेतन नरके, ज्योती दीपक पाटील, अॅड. दत्तात्रय राणे आणि युवराज गवळी यांचा समावेश आहे.

गोकुळ निवडणुकीतील महत्त्वाचा टप्पा असलेली उमेदवारी अर्जांची छाननी आज बुधवारी रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात सुरू होणार आहे. सकाळी पावणेअकराच्या सुमारास अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे. सुरुवातीला सर्वसाधारण गटातील उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. यावेळी कोणत्याही अर्जावर हरकत आल्यास त्यावर निर्णय घेतला जाईल. त्यानंतर इतर गटांतील अर्जांची छाननी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. २५ जागांसाठी ३०१ इच्छुक आणि ४३६ अर्ज असल्याने छाननी प्रक्रियेत कोणते अर्ज वैध ठरतात आणि कोणत्या उमेदवारांच्या अर्जांवर हरकती येतात, याकडे आता गोकुळ निवडणुकीतील इच्छुकांसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


गोकुळ निवडणुकीत २५ जागांसाठी ४३६ अर्ज; आज उमेदवारी अर्जांची छाननी
Total Views: 10