बातम्या
वीस दिवसांत ४५० वनराई बंधारे; कोल्हापूरच्या जंगलात साठणार ३ कोटी लिटर पाणी!
By nisha patil - 10/30/2026 3:16:16 PM
Share This News:
वीस दिवसांत ४५० वनराई बंधारे; कोल्हापूरच्या जंगलात साठणार ३ कोटी लिटर पाणी!
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धनासाठी कोल्हापूर वन विभागाने एक कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. अवघ्या वीस दिवसांत लोकसहभागातून तब्बल ४५० वनराई बंधारे उभारण्यात आले असून, यातून सुमारे तीन कोटी लिटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, वन विभागाने आता एक हजार वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
महात्मा गांधी जयंती आणि वन्यजीव सप्ताहाच्या प्रारंभानिमित्त २ ऑक्टोबरपासून या अभियानाला सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला तसेच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी श्रमदानातून या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. या बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे. परिणामी भूजल पातळीत वाढ होण्यासोबतच विहिरी आणि इतर जलस्रोतांमधील पाण्याची उपलब्धता टिकून राहणार आहे.
विशेष म्हणजे, जंगलातच पाण्याचे स्रोत उपलब्ध झाल्यामुळे वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे येण्याचे प्रमाण कमी होऊन मानव-वन्यजीव संघर्षालाही आळा बसण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलसंवर्धनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच वनमंत्री गणेश नाईक यांच्या सूचनांनुसार हे अभियान राबविण्यात येत आहे.
वीस दिवसांत ४५० वनराई बंधारे; कोल्हापूरच्या जंगलात साठणार ३ कोटी लिटर पाणी!
|