व्यवसाय

महावितरणच्या ग्राहक मेळाव्यांचा 454 ग्राहकांनी घेतला लाभ

454 customers benefited from Mahavitarans customer gatherings


By nisha patil - 4/18/2026 3:43:15 PM
Share This News:



महावितरणच्या ग्राहक मेळाव्यांचा 454 ग्राहकांनी घेतला लाभ

महावितरणतर्फे जिल्ह्यातील सौर कृषिपंप तसेच घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी शुक्रवार (दि.१७) रोजी विशेष तक्रार निवारण मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील ३० उपविभागात घेण्यात आलेल्या मेळाव्यांचा 454 ग्राहकांनी लाभ घेतला. यापैकी 412 ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा जागेवर करण्यात आला. तर प्रलंबित 42 तक्रारीं विहित वेळेत निकाली काढण्याच्या सुचना कोल्हापूर मंडल कार्यालयाचे प्रभारी अधीक्षक अभियंता दत्तात्रय भणगे यांनी दिले आहेत. तक्रारींचा निपटारा झाल्याने सदर मेळाव्यांप्रती ग्राहकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी कोल्हापूर शहर विभागात मेळाव्यांमध्ये प्राप्त 52 पैकी 52 तक्रारी, कोल्हापूर ग्रामीण 1 विभागातील मेळाव्यांमध्ये 79 पैकी 67 तक्रारी, कोल्हापूर ग्रामीण 2 विभागातील मेळाव्यांमध्ये 105 पैकी 92 तक्रारी, गडहिंग्लज विभागातील मेळाव्यांमध्ये 63 पैकी 51 तक्रारी, इचलकरंजी विभागातील मेळाव्यांमध्ये 122 पैकी 122 तक्रारी, जयसिंगपूर विभागातील मेळाव्यांमध्ये 33 पैकी 28 तक्रारी जागेवर तात्काळ सोडवण्यात आल्या.   

महावितरणने कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या मार्गदर्शनातून शुक्रवारी सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 पर्यंत उपविभागीय स्तरावर ग्राहक मेळावा घेण्यात आला. ग्राहकाने दाखल तक्रारींत प्रामुख्याने सौर कृषी पंप, नवीन वीज जोडणी, वाढीव वीज बिले, कृषिपंप ग्राहकांचा वीज भार कमी करणे व विविध शंका यांचा प्रामुख्याने समावेश होता. या मेळाव्यात स्मार्ट टीओडी मीटरच्या संबधीत सर्वच तक्रारींचे प्रात्यक्षिकांसह निरसन करण्यात आले. यावेळी ग्राहकांना पीएम सुर्यघर योजना, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देणेकरीता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी योजनांची माहितीही देण्यात आली.


महावितरणच्या ग्राहक मेळाव्यांचा 454 ग्राहकांनी घेतला लाभ
Total Views: 19