बातम्या
२०१२ च्या ऊस आंदोलनातील ५१ आंदोलकांची निर्दोष मुक्तता
By nisha patil - 12/19/2025 5:07:13 PM
Share This News:
२०१२ च्या ऊस आंदोलनातील ५१ आंदोलकांची निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह प्रमुख नेत्यांचा समावेश
इंदापूर (प्रतिनिधी) : इंदापूर येथे सन २०१२ मध्ये झालेल्या ऊस आंदोलनप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एकूण ८ गुन्ह्यांपैकी ३ गुन्ह्यांतून माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह सतिशभैय्या काकडे, सदाभाऊ खोत, निलेश देवकर यांच्यासह ५१ आंदोलकांची इंदापूर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
सन २०१२ मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिटन २७०० रुपये पहिली उचल जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र त्या काळात राज्यातील कोणत्याही साखर कारखान्याने ऊसदर जाहीर केला नव्हता. तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या प्रश्नावर तोडगा काढावा, यासाठी कर्मयोगी साखर कारखान्यावर धरणे आंदोलन करण्यात आले होते.
यानंतर सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन झाल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली. या आंदोलनादरम्यान कुंडलिक कोकाटे या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती.
जवळपास आठवडाभर चाललेल्या आंदोलनातील संघर्षानंतर राजारामबापू साखर कारखान्याने प्रतिटन २५०० रुपये पहिली उचल जाहीर केली आणि उसदराची कोंडी फुटली. मात्र राज्यभर आंदोलन झाल्याने हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या आंदोलनामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन सुमारे ३०० रुपये जादा दर मिळाल्याचेही स्पष्ट झाले.
या प्रकरणाची सुनावणी इंदापूर न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एच. फारुकी यांच्या न्यायालयात झाली. या खटल्याचे कामकाज ॲड. एन. जे. शहा, ॲड. महेश ढुके, ॲड. श्रीकांत करे, ॲड. सचिन राऊत व ॲड. नवनाथ सोनटक्के यांनी विनामूल्य पाहिले.
२०१२ च्या ऊस आंदोलनातील ५१ आंदोलकांची निर्दोष मुक्तता
|