बातम्या
ऊस आंदोलनात ६१ तासांचा महामार्ग रोको; कागलकर ठरले सरसेनापती!
By nisha patil - 11/14/2026 2:25:07 PM
Share This News:
ऊस आंदोलनात ६१ तासांचा महामार्ग रोको; कागलकर ठरले सरसेनापती!
प्रतिनिधी अजित बोडके ऊस आंदोलनाच्या ऐतिहासिक यशात कागल तालुका सरसेनापती ठरला आहे. तब्बल ६१ तास पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत कागलच्या शेतकऱ्यांनी आंदोलनाला आक्रमक धार दिली. त्यांच्या या लढ्यामुळेच राज्य सरकार आणि साखर कारखानदारांना शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी लागली. यंदाच्या ऊस दराच्या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अभूतपूर्व लढा उभारला. या लढ्यात कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग आणि आक्रमक भूमिका निर्णायक ठरली. त्यामुळेच शेतकऱ्यांना यंदा उच्चांकी ऊस दर मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला.
दरम्यान, कागल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी या सत्काराचे खरे मानकरी कागल तालुक्यातील शेतकरी आणि कार्यकर्ते असल्याचे सांगितले. राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल तालुक्याची आता चळवळीचे विश्वविद्यापीठ म्हणून नवी ओळख निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
म्हाकवे, बानगे, मुरगूड, एकोंडी, लिंगनूरसह तालुक्यातील अनेक गावांतील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी या सत्कार सोहळ्यात सहभाग घेतला.
ऊस आंदोलनात ६१ तासांचा महामार्ग रोको; कागलकर ठरले सरसेनापती!
|