राजकीय
पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोल्हापूरातील सायकलपटूंकडून अनोखी मानवंदना — ७५ सायकलपटूंची ७५ किलोमीटर रॅली
By nisha patil - 10/11/2025 12:38:19 PM
Share This News:
कोल्हापूर, दि. ९ नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत आज कोल्हापुरातील ७५ सायकलपटूंनी ७५ किलोमीटरची सायकल रॅली काढून पंतप्रधानांना अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली. या उपक्रमातून ‘फिट युवा, विकसित भारत’ या संकल्पनेला प्रेरणा मिळाली.
ही सायकल रॅली कोल्हापूर ते निपाणी आणि पुन्हा कोल्हापूर असा ७५ किलोमीटरचा प्रवास करत पार पडली. रॅलीचा शुभारंभ सकाळी ७ वाजता ताराराणी चौकातून खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाला. मार्गामध्ये शिवाजी विद्यापीठ, गोकुळ शिरगाव मार्गे पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून निपाणीकडे या रॅलीने गती घेतली.
या रॅलीत ६ वर्षांपासून ७६ वर्षांपर्यंतच्या सायकलपटूंचा सहभाग होता. निपाणी येथे हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील, उपाध्यक्ष पवनकुमार पाटील यांच्या हस्ते सायकलपटूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश शिंदे, जयवंत भाटले, राजेंद्र गुंदेशा, रावसाहेब फराळे, सुहास गुगे, सुनील पाटील, रामगोंडा चौगुले, भरत नसलापुरे व व्यवस्थापकीय संचालक आप्पासाहेब शिरगावे उपस्थित होते.
७५ किलोमीटरचे अंतर पूर्ण केल्यानंतर रॅली पुन्हा कोल्हापुरात परतली. शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सर्व सायकलपटूंना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके तसेच प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
या प्रसंगी खासदार महाडिक म्हणाले, “कोल्हापूरातील सायकलपटूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेली ही अनोखी मानवंदना प्रेरणादायी आहे. या उपक्रमातून युवक, युवती आणि ज्येष्ठ नागरिकांनी प्रेरणा घेऊन फिटनेसकडे लक्ष द्यावे.”
या रॅलीचे संयोजन ‘सायकल वेडे कोल्हापूर’ या ग्रुपतर्फे करण्यात आले होते. अध्यक्ष राम कारंडे, पांडुरंग माळी, जयदीप पाटील, अंकुश पाटील, इंद्रजित बागल आणि विवेक शिंदे यांनी आयोजनाची धुरा सांभाळली. या उपक्रमासाठी खासदार क्रीडा महोत्सवाचे समन्वयक उमेश पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोल्हापूरातील सायकलपटूंकडून अनोखी मानवंदना — ७५ सायकलपटूंची ७५ किलोमीटर रॅली
|