बातम्या

महाआरोग्य शिबिराच्या साक्षीने अशोकअण्णांचा वाढदिवस उत्साहात संपन्न

751


By nisha patil - 11/15/2026 10:49:17 PM
Share This News:



**महाआरोग्य शिबिराच्या साक्षीने अशोकअण्णांचा वाढदिवस उत्साहात संपन्न*

*पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांनी अशोकअण्णांच्या कार्याचे केले कौतुक*

**आजरा(हसन तकीलदार)*:-महाआरोग्याच्या साक्षीने आजऱ्याचे लोकनेते तथा आजरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व आण्णा भाऊ उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकआण्णा चराटी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 70 व्या वाढदिवसानिमित्य महाआरोग्यशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिरात गरजूना चष्मे, श्रवणयंत्रे वाटप करण्यात आले. तसेच महिला आरोग्य तपासणी, सोनोग्राफी, मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, इसीजी यासारख्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. आरोग्यशिबिरात 1250 हुन अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

 

   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील होते. तर वाढदिवसानिमित्य आयोजित महाआरोग्यशिबिराचे शुभारंभ मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार शिवाजीराव पाटील, वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक आजरा अर्बन बँकेचे संचालक विजय पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक बाचूळकर यांनी केले.

   यावेळी उपस्थित मान्यवरांनी अशोक अण्णांच्या कार्याचा उल्लेख करीत कौतुक केले. आजऱ्याला मिळालेली नगरपंचायत,आजरा शहराची पाणी योजना, नगरपंचायत इमारत, क्रीडा संकुल, या बाबतची माहिती देत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अशोक अण्णांच्या कार्याचे कौतुक केले. पुढे ते म्हणाले की, आजरा तालुक्यात तीन धरणे झाली आहेत. मात्र अद्यापही हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचलेले नाही. शेतीपर्यंत पाणी पोहचवण्यासाठी लवकरच उपाययोजना आखल्या जातील तसेच तालुक्याच्या विकासासाठी ज्या ज्या अपेक्षा अपेक्षित आहेत त्या पूर्ण करण्यासाठी नेहमीच कटीबद्ध राहणार आहे. वाढदिवस बरेचजण साजरा करतात परंतु अशा भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे असेही आबिटकर म्हणाले.

    आमदार शिवाजीराव पाटील यांनी प्रत्येक तालुका विधानसभेला एक मतदारसंघ असावा आणि अशोकआण्णा चराटी हे आमदार व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली. आजरा, चंदगड, राधानगरी तालुके पर्यटन तालुके म्हणून घोषित व्हावीत यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आजरा, चंदगड तालुक्यासाठी धर्मादाय हॉस्पिटल सुरु करण्याची मागणी त्यांनी केली.

    वाढदिवसानिमित्य सत्काराला उत्तर देताना अशोकअण्णा म्हणाले की, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आजरा शहर व तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. त्या माध्यमातून विकास कामांना गती मिळाली आहे. मी आजरा शहराच्या विकासासाठी काम करीत आलो आहे. इथून पुढचे आयुष्यही जनतेसाठीच समर्पित करणार आहे. यावेळी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील, आजरा साखर कारखाना,जनता बँक चेअरमन मुकुंद देसाई, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनीही आपली मनोगत व्यक्त केली.

    यावेळी आजरा तहसीलदार समीर माने, गोड साखरचे अध्यक्ष प्रकाश पताडे, चंदगडचे नगराध्यक्ष सुनील काणेकर, विष्णुपंत केसरकर, उदयराज पोवार, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ. सरिता थोरात, वैद्यकीय अधीक्षक अमोल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र गुरव, डॉ. सुरजीत पांडव, दशरथ अमृते, अनिकेत कवळेकर, जयवंत सुतार, महेश खेडेकर, सुधीर कुंभार, राजू होलम, समीर पारदे, रणजित देसाई, मारुती मोरे, इंद्रजित देसाई, संतोष भाटले, शरीफ खेडेकर, माजी नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी-पाटील, अमानुल्ला आगलावे, मेहताब आगा तसेच अशोक आण्णा प्रेमी कार्यकर्ते, आण्णा भाऊ समूहाचे पदाधिकारी, कर्मचारी आदिजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आभार विलास नाईक यांनी मानले.


महाआरोग्य शिबिराच्या साक्षीने अशोकअण्णांचा वाढदिवस उत्साहात संपन्न
Total Views: 243