बातम्या

शिरोली ऊस आंदोलन प्रकरणात राजू शेट्टींसह ८० जणांची निर्दोष मुक्तता

80 people including Raju Shetty acquitted


By nisha patil - 11/29/2025 3:34:08 PM
Share This News:



शिरोली ऊस आंदोलन प्रकरणात राजू शेट्टींसह ८० जणांची निर्दोष मुक्तता

कोल्हापूर (प्रतिनिधी) शिरोली येथे २०११ साली झालेल्या ऊस दर आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यातून खासदार राजू शेट्टी यांच्यासह ८० शेतकरी कार्यकर्त्यांची कोल्हापूर सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायाधीश कश्यप यांच्या कोर्टात सुनावणी झाल्यानंतर हा निकाल देण्यात आला. तब्बल १६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर न्याय मिळाल्याने आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी न्यायालयाच्या आवारातच एकमेकांना गळाभेट देत आनंद व्यक्त केला.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले,
“शेतकरी आंदोलने सुरू असताना ती दडपण्यासाठी तत्कालीन राज्यसरकारने पोलिस प्रशासनास हाताशी धरून हा गुन्हा जाणीवपूर्वक दाखल केला होता. आज निर्दोष मुक्तता झाल्यामुळे चळवळ पुन्हा लढण्यासाठी कार्यकर्त्यांना बारा हत्तीचे बळ मिळाले आहे. शेतकरी हा न्यायासाठी आणि आपल्या घामाच्या दामासाठी लढत होता, आणि पुढेही लढतच राहणार,” असे त्यांनी स्पष्ट केले.

शिरोलीतील घटनेनंतर सुरुवातीस या गुन्ह्याचे कामकाज वडगाव न्यायालयात सुरू होते. त्यानंतर प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले. गेले पंधरा वर्षे सर्व आरोपी शेतकरी न्यायालयाच्या चकरा मारत होते. अखेर प्रदीर्घ कालावधीनंतर सर्वांच्या खांद्यावरील गुन्ह्याचा खापर दूर झाले.

सदर प्रकरणातील न्यायालयीन कामकाज ॲड. ब्रिजेश शास्त्री, ॲड. श्रेणिक पाटील, ॲड. अमेय मकरे, ॲड. सुवर्णभद्र पाटील, ॲड. टी. वाय. जाधव, ॲड. प्रिती चिटणीस, ॲड. ऋषिकेश काकडे, ॲड. ऋषिकेश शास्त्री, ॲड. व्ही. व्ही. डोईजड यांनी हाताळले.


शिरोली ऊस आंदोलन प्रकरणात राजू शेट्टींसह ८० जणांची निर्दोष मुक्तता
Total Views: 25