बातम्या

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी पेरणोली येथे बैठक संपन्न

806


By nisha patil - 11/27/2026 11:44:56 PM
Share This News:



**शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी पेरणोली येथे बैठक संपन्न*

**आजरा(हसन तकीलदार)*:- शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधासाठी तसेच आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मौजे पेरणोली, तालुका आजरा येथे बाधित शेतकऱ्यांची व पर्यावरण प्रेमिंची बैठक संपन्न झाली. शासनाच्या हुकूमशाही व शेतकरी विरोधी धोरणाचा प्रथम निषेध नोंदवण्यात आला आणि शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी तालुक्यातील इतर बाधित गावांच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन पुन्हा लढाईस सज्ज राहण्याचे ठरवण्यात आले. या बैठकीत सर्वानुमते येत्या आठवड्यात आजरा तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्याचे त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या घरावर मोर्चा काढण्याचे ठरवण्यात आले.

      खरंतर शक्तिपीठ असे गोंडस नाव देऊन लोकांच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रकार आहे. सरकारला शक्तिपीठाच्या नावाखाली भांडवलदार आणि बड्या व्यापाऱ्यांसाठी हा महामार्ग बनवायचा आहे. या महामार्गची कोणत्याही शेतकऱ्याने मागणी केली नसल्याने वास्तवीक या रस्त्याची गरजच नाही. या रस्त्याला अन्य पर्यायी अनेक रस्ते असतानासुद्धा शक्तिपिठाचा अट्टाहास कशासाठी हेच कळत नाही असा सूर बैठकीत दिसून आला. सुपीक शेती, पर्यावरण, येथील लोकांभीमुख संस्कृती, जंगले आणि दुर्मिळ वनसंपदा वाचवण्यासाठी आपल्याला ही लढाई तिव्र करावी लागणार आहे असे सर्वानुमते ठरले.

        या बैठकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई, कॉ.संपत देसाई, पत्रकार कृष्णा सावंत, सर्जेराव देसाई, निवृत्ती फगरे, दिनेश कांबळे, जालिंदर कांबळे, पांडुरंग देसाई, ज्ञानदेव ढोकरे, प्रल्हाद देसाई, पांडुरंग गुरव, शिवराम गुरव, यशोदा हळवणकर, छाया गुरव, अनुसया गुरव, मारुती फगरे, फिलिप लोबो, सुभाष देसाई यांच्यासह महामार्ग बाधित शेतकरी, महिला आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.


शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी पेरणोली येथे बैठक संपन्न
Total Views: 104