बातम्या
महावितरणच्या अभय योजनेचा ८५६ ग्राहकांनी घेतला लाभ
By nisha patil - 11/26/2026 10:57:06 PM
Share This News:
महावितरणच्या अभय योजनेचा ८५६ ग्राहकांनी घेतला लाभ
कोल्हापूर / सांगली, दि. २६ नोव्हेंबर २०२६ : महावितरणने वीज ग्राहकांच्या वीजबिल थकबाकीमुक्तीसाठी लघु व उच्चदाबाच्या कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित बिगरकृषी वीजग्राहकांसाठी ‘अभय योजना २०२६-२७' जाहीर केली आहे. या योजनेत कोल्हापूर परिमंडलातील ८५७ ग्राहकांनी लाभ घेत ४८ लाख ५८ हजारांचा भरणा केला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ६६० ग्राहकांनी ३८ लाख ६६ हजार तर सांगली जिल्ह्यातील १९७ ग्राहकांनी ९ लाख ९२ हजार रुपयांचा भरणा केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ३३ हजार २५४ लघुदाब वीज ग्राहक असून यांच्याकडे २४ कोटी ३३ लाखांची तर ७२ उच्चदाब ग्राहकांकडे ५२ कोटी ७६ लाख थकबाकी आहे. कोल्हापूर पात्र ग्राहकांनी योजनेत विहित वेळेत सहभाग नोंदवल्यास त्यांचे १९ कोटी ०३ लाख रुपयांचे व्याज व दंड माफ होणार आहे. तर सांगली जिल्ह्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ५५ हजार ४४५ लघुदाब वीज ग्राहक असून यांच्याकडे ३६ कोटी ४१ लाखांची तर ४३ उच्चदाब ग्राहकांकडे १४ कोटी ६२ लाख थकबाकी आहे. सांगली जिल्ह्यातील पात्र ग्राहकांनी योजनेत विहित वेळेत सहभाग नोंदवल्यास त्यांचे ०५ कोटी ९३ लाख रुपयांचे व्याज व दंड माफ होणार आहे.
दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत ज्या उच्च व लघुदाब वर्गवारीमधील थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे असे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर बिगरकृषी (शेती व सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना वगळून) ग्राहक तसेच दि. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक 'अभय योजना २०२६-२७' साठी पात्र आहेत. १५ जानेवारी २०२७ पर्यंत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून या योजनेअंतर्गत एकूण थकबाकीमधील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे.
या योजनेत मूळ थकबाकीची रक्कम एकाच वेळी किंवा हप्त्यांनी भरण्याची ग्राहकांना सुविधा आहे. या योजनेनुसार १५ डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांना 'अर्ली बर्ड रिबेट'चा फायदा देण्यात येत आहे. पात्र वीज ग्राहकांनी अधिक माहिती घेऊन योजनेत सहभागी होण्याकरिता संबंधित कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केले आहे.
महावितरणच्या अभय योजनेचा ८५६ ग्राहकांनी घेतला लाभ
|