बातम्या

कोविड योध्यांना सेवेत कायम करण्यासाठी संघटित व कायदेशीर लढा उभा करणार - कॉ.संग्राम सावंत*

86


By nisha patil - 9/20/2026 9:50:12 PM
Share This News:



**कोविड योध्यांना सेवेत कायम करण्यासाठी संघटित व कायदेशीर लढा उभा करणार - कॉ.संग्राम सावंत*

**आजरा(हसन तकीलदार)*:-कोविड काळातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी सेवेसाठी आजरा–चंदगड–गडहिंग्लज तालुक्यातील व्यापक मेळावा नेसरी येथील मसणाई मंदिर संपन्न झाला.

मेळाव्यात विविध ठराव करून लढ्याची पुढील आखणी करणेत आली.

            कोविड महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्थेच्या पहिल्या फळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी सेवेसाठी आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील आरोग्य कोविड कर्मचारी व संघटनकर्त्यांची व्यापक बैठक रविवारी सकाळी ११.०० वाजता नेसरी येथील मसणाई मंदिर परिसरात संपन्न झाली.

बैठकीचे मार्गदर्शन कॉम्रेड संग्राम सावंत (राज्याध्यक्ष, सविधान संवर्धन चळवळ व समन्वयक, अखिल भारतीय किसान सभा) आणि कायदेतज्ञ ॲड. दशरथ दळवी यांनी केले. 

  या मेळाव्यात बोलताना,कायदेतज्ञ ॲड. दशरथ दळवी म्हणाले की, अनेक कर्मचाऱ्यांना मोबाईलवरील संदेशाद्वारे तातडीने कामावर बोलावण्यात आले. महामारी ओसरल्यानंतर कर्मचारी कमी करत शेवटी अनेकांना कामावरून काढून टाकण्यात आले. सहा-सहा महिन्यांच्या बॉण्डवर दिलेली नोकरी कर्मचाऱ्यांना अनिश्चिततेत ढकलणारी व्यवस्था ठरल्याचे नमूद करण्यात आले. मात्र त्यांना अत्यावश्यक सेवेवेळी घेऊन गरजेपुरते वापरण्यात आले याविरोधात कायदेशीर व रस्त्यावरचा लढा उभा करणार.

        कॉम्रेड संग्राम सावंत म्हणाले, “कोविडच्या काळात व्यवस्थेला कर्मचारी हवे होते, महामारी संपताच ते अनावश्यक ठरवले गेले. ही केवळ नोकरीची नाही, तर सार्वजनिक आरोग्य व संवैधानिक न्यायाची लढाई आहे. लढण्याची हिंमत हाच आधार आहे.”

आजरा,चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यांतील कोविड काळातील सर्व कर्मचारी कागदपत्रे जमा करून संघटनेशी संपर्क साधावा व पुढील आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

               यावेळी अमानुल्ला आगलावे(सामाजिक कार्यकर्ते ),राजाराम मांगले,रविंद्र भोसले,अभिजीत शिंत्रे, अमृता पाटील, अल्फाज आगलावे,रामलिंग कांबळे, वृषाली पाटील, प्रियांका कदम, राजेंद्र उपराटे, प्रियांका तारळे, शहाहुसेन पठाण,स्वाती सुतार यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

         कोविड काळातील नोकरी, बॉण्डपद्धती, कर्मचाऱ्यांची कपात व कायम सेवेसाठीच्या लढ्याबाबत चर्चा होऊन,कोविड काळात काम केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना प्राधान्याने शासकीय सेवेत कायम करण्यासाठी संघटित लढा उभा करणार, कोविड काळातील थकीत पगारासाठी लढा उभारणार, कोविड काळात कामावर आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची तालुकानिहाय यादी तयार करून माहिती घेण्यात येणार,सहा महिन्यांच्या बॉण्डवर नोकरी देणे शोषण ठरते. बॉण्डपद्धती रद्द करून नियमित व कायम सेवेत सामावून घ्यावे यासाठी कोल्हापूर जिल्ह्याची लढाऊ संघटना राज्यात उभी करणार.संघटनात्मक रचना उभी करून सेवा कायम करण्यासाठी निकराचा लढा देणार, गाव, तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर जनसमर्थन वाढवून संघटित शक्ती निर्माण करणार आणि टप्प्याटप्प्याने क्रमशः लढा देणार,कंत्राटीकरण पद्धत प्रत्येक क्षेत्रातून हद्दपार करण्यासाठी जनप्रबोधनासह जनलढा उभारणार,

आरोग्य कर्मचारी संघर्ष नावाने लढा उभा करणार असे विविध ठराव यावेळी करण्यात आले व कायदेशीर व रस्त्यावरील लढ्याची पुढची दिशा ठरवण्यात आली.

 कायदे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर तयारी करण्यात येणार असलेबाबतही सांगणेत आले.

हा मेळावा विशाल वायदंडे,राकेश कांबळे,केतन सुतार, अजय रेडेकर,विनोद धुमाळे, अभिजीत रेडेकर,राहुल कांबळे, गंगाधर कांबळे, योगेश परीट,प्रियंका तारळे,वर्षाराणी पाटील यांच्यासह आजरा,चंदगड आणि गडहिंग्लज मधील कोविड कर्मचारी व कार्यकर्त्यांनी यशस्वी केला.


कोविड योध्यांना सेवेत कायम करण्यासाठी संघटित व कायदेशीर लढा उभा करणार - कॉ.संग्राम सावंत*
Total Views: 88