बातम्या
महावितरणच्या ८८ हजार ६९९ ग्राहकांना थकबाकीमुक्त होण्याची संधी
By nisha patil - 11/17/2026 6:18:36 PM
Share This News:
महावितरणच्या ८८ हजार ६९९ ग्राहकांना थकबाकीमुक्त होण्याची संधी
कोल्हापूर / सांगली, दि. १७ नोव्हेंबर २०२६: महावितरणने वीज ग्राहकांच्या वीजबिल थकबाकीमुक्तीसाठी लघु व उच्चदाबाच्या कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित बिगरकृषी वीजग्राहकांसाठी ‘अभय योजना २०२६-२७' जाहीर केली आहे. कोल्हापूर परिमंडलातील ८८ हजार ८१४ ग्राहक या अभय योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ३३ हजार ३२६ तर सांगली जिल्ह्यातील ५५ हजार ४८८ वीज ग्राहकांचा समावेश असून यांच्याकडे एकत्रित १२८ कोटी ०१ लाख इतकी थकबाकी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ३३ हजार २४५ लघुदाब वीज ग्राहक असून यांच्याकडे २४ कोटी ३३ लाखांची तर ७२ उच्चदाब ग्राहकांकडे ५२ कोटी ७६ लाख थकबाकी आहे. कोल्हापूर पात्र ग्राहकांनी योजनेत विहित वेळेत सहभाग नोंदवल्यास त्यांचे १९ कोटी ०३ लाख रुपयांचे व्याज व दंड माफ होणार आहे. तर सांगली जिल्ह्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ५५ हजार ४४५ लघुदाब वीज ग्राहक असून यांच्याकडे ३२ कोटी ३६ लाखांची तर ४३ उच्चदाब ग्राहकांकडे १२ कोटी ६२ लाख थकबाकी आहे. सांगली जिल्ह्यातील पात्र ग्राहकांनी योजनेत विहित वेळेत सहभाग नोंदवल्यास त्यांचे ०५ कोटी ९३ लाख रुपयांचे व्याज व दंड माफ होणार आहे.
दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत ज्या उच्च व लघुदाब वर्गवारीमधील थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे असे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर बिगरकृषी (शेती व सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना वगळून) ग्राहक तसेच दि. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक 'अभय योजना २०२६-२७' साठी पात्र आहेत. १५ जानेवारी २०२७ पर्यंत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. थकबाकीमुक्तीसाठी सवलतींचा समावेश असणाऱ्या अभय योजनेअंतर्गत एकूण थकबाकीमधील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. तर उर्वरित मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यात आणखी २० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. यासह मागणीनुसार पुनर्जोडणी तात्काळ मिळणार आहे.
या योजनेत मूळ थकबाकीची रक्कम एकाच वेळी किंवा हप्त्यांनी भरण्याची ग्राहकांना सुविधा आहे. या योजनेनुसार १५ डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांना 'अर्ली बर्ड रिबेट'चा फायदा देण्यात येईल. यात लघुदाब घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना ३ वर्षांपर्यंत वीजजोडणी कायमस्वरूपी खंडित असल्यास १० टक्के तर ३ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कायमस्वरुपी खंडित असल्यास २० टक्के सवलत मिळेल. तसेच लघुदाब घरगुती व व्यावसायिक वगळून इतर सर्व लघु व उच्चदाब ग्राहकांना अनुक्रमे १० टक्के व १५ टक्के सूट मिळेल. लघुदाब ग्राहकांना ५० टक्के डाऊन पेमेंट भरून उर्वरित रकमेसाठी ६ समान व्याजमुक्त मासिक हप्ते तर उच्चदाब ग्राहकांना थकबाकीनुसार व्याजमुक्त ३ ते ६ हप्त्यांची सुविधा उपलब्ध असेल.
यासोबतच मंजूर भार २० किलोवॉटपर्यंत आहे अशा ग्राहकांनी पुनर्जोडणीच्या वेळी 'प्रीपेड स्मार्ट मीटर'चा पर्याय निवडल्यास मूळ थकबाकीमध्ये अतिरिक्त ५ टक्के सवलत दिली जाईल. उल्लेखनीय म्हणजे या योजनेत सहभागी सर्व ग्राहकांसाठी पुनर्जोडणी शुल्क आणि लघुदाब ग्राहकांसाठी सर्व्हिस कनेक्शन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.
पात्र वीज ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा – स्वप्नील काटकर
‘अभय योजना २०२६-२७' साठी अर्जाची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि ऑनलाईन ठेवण्यात आली आहे. महावितरणच्या ऑनलाइन पोर्टल किंवा मोबाईल अॅपद्वारे ग्राहक अर्ज करू शकतील तसेच प्रत्यक्ष कार्यलयात भेट देऊ शकतात. या योजनेत मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात येत असून याचा लाभ पात्र वीज ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केले आहे.
महावितरणच्या ८८ हजार ६९९ ग्राहकांना थकबाकीमुक्त होण्याची संधी
|