बातम्या

संवेदनशीलतेचे दर्शन - नदीकाठी उघड्या पडलेल्या गणेशमूर्तींचे युवकांकडून कडून सुरक्षित स्थळी पुनर्विसर्जन

A Display of Sensitivity


By nisha patil - 9/21/2026 11:19:50 PM
Share This News:



संवेदनशीलतेचे दर्शन - नदीकाठी उघड्या पडलेल्या गणेशमूर्तींचे युवकांकडून कडून सुरक्षित स्थळी पुनर्विसर्जन

*आदर्शवत कार्याचे होत आहे कौतुक
 

*आजरा(हसन तकीलदार):-  गणेशोत्सवाच्या सांगतेनंतर  नदीपात्रात अत्यंत भावुक वातावरणात गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडले. मात्र,दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे  विसर्जित केलेल्या श्रींच्या मूर्ती पुन्हा पाण्याच्या पृष्ठभागावर दिसू लागल्या होत्या. हा परिसर आसपासच्या गुराढोरांच्या नेहमीच्या वावराचा भाग असल्याने, तिथे विटंबना किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक सुजाण नागरिकांनी आणि तरुणांनी वेळीच पुढाकार घेत कोणताही गाजावाजा न करता अत्यंत शांततेत व आदराने या मूर्तींचे पुनर्विसर्जन केले.

नदीकाठावर दररोज सकाळी आसपासच्या परिसरातील गुरेढोरे पाणी पिण्यासाठी येत असतात. पाणी ओसरल्याने किनाऱ्यालगतच मूर्ती उघड्या पडल्याचे सकाळी काही प्रत्यक्षदर्शींच्या लक्षात आले. पाणी प्यायला येणाऱ्या जनावरांच्या पायाखाली या मूर्ती येण्याची शक्यता ओळखून, तिथल्या ग्रामस्थांनी आणि तरुणांनी क्षणाचाही विलंब न लावता ही संवेदनशील परिस्थिती अगदी चांगल्या पद्धतीने हाताळली.

नदीच्या पात्रातच काही अंतरावर एक खोलगट डबका आहे, जिथे वर्षभर मुबलक पाणी असते आणि तिथे जनावरांचा वावरही अजिबात नसतो. उपस्थित युवकांनी अत्यंत आदराने, धार्मिक भावनांचे आणि मर्यादांचे पूर्ण भान राखत किनाऱ्यावर आलेल्या त्या सर्व मूर्ती हळुवारपणे उचलून भक्तीभावाने त्या सुरक्षित खोल भागात विसर्जित केल्या.

या प्रसंगी गौरव देशपांडे,सुरेश पत्की, दीपक कुरुणकर, वृषाल हुक्केरी, तेजस कुरुणकर, संतोष परिट, प्रणव कुरुणकर, दयानंद बागवे, सतीश बागवे, दयानंद कोंडूस्कर, किरण बागवे यांच्यासह स्थानिक तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कोणताही गाजावाजा न करता, अत्यंत समंजसपणाने आणि शांततेत पार पाडलेल्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. उत्सवातील भक्तिभावासोबतच उत्सवानंतरही श्रद्धेचे पावित्र्य राखणे आणि निसर्गाचे भान ठेवणे किती गरजेचे आहे, याचा एक उत्तम वस्तूपाठच या स्थानिक युवकांनी आपल्या कृतीतून घालून दिला आहे.युवकांचे हे कार्य खरोखरच अतुलनीय आणि उल्लेखनीय आहे.
       भविष्यात असे प्रकार होऊ नये यासाठी गणेश भक्तांनी पर्यावरण पूरक, इको फ्रेंडली मूर्ती विसर्जित करणे गरजेचे आहे असे गौरव देशपांडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले


संवेदनशीलतेचे दर्शन - नदीकाठी उघड्या पडलेल्या गणेशमूर्तींचे युवकांकडून कडून सुरक्षित स्थळी पुनर्विसर्जन
Total Views: 25