‘गोकुळ’ची दूध उत्पादकांना दिवाळी भेट! ११७ कोटींचा दूध दर फरक खात्यावर जमा!
By nisha patil - 10/30/2026 5:08:02 PM
Share This News:
‘गोकुळ’ची दूध उत्पादकांना दिवाळी भेट! ११७ कोटींचा दूध दर फरक खात्यावर जमा!
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ने दूध उत्पादकांना दिवाळीची मोठी आर्थिक भेट दिली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील अंतिम दूध दर फरकापोटी तब्बल ११७ कोटी ४२ लाख रुपये प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आले आहेत. १९ ऑक्टोबर रोजी ही रक्कम वर्ग करण्यात आली असून, जिल्हा आणि सीमाभागातील सुमारे ८ हजार दूध संस्थांच्या ५ लाख दूध उत्पादक सभासदांना याचा लाभ होणार आहे.
यंदा म्हैस दूध उत्पादकांना प्रतिलिटर सरासरी २ रुपये २५ पैसे, तर गाय दूध उत्पादकांना १ रुपये २५ पैसे दर फरक देण्यात आला आहे. यामध्ये म्हैस दुधासाठी ६३ कोटी १२ लाख, गाय दुधासाठी ३९ कोटी १३ लाख, दर फरकावरील व्याज आणि डिबेंचर व्याजाचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, अंतिम दर फरकासह म्हैस दूध उत्पादकांना प्रतिलिटर सरासरी ६१ रुपये ९८ पैसे, तर गाय दूध उत्पादकांना ३७ रुपये ५३ पैसे दर मिळाला आहे. गोकुळने यंदा प्रतिदिन दूध संकलनाचा २० लाख लिटरचा टप्पा ओलांडला असून, एका दिवसात २५ लाख ४५ हजार लिटर दूध विक्रीचा विक्रमही केला आहे.
सन २०२५-२६ मध्ये गोकुळची वार्षिक उलाढाल ४,१८५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दूध उत्पादकांच्या आर्थिक उन्नतीसाठी पशुवैद्यकीय सेवा, पशुखाद्य, कृत्रिम रेतन, वैरण विकास, विमा, वासरू संगोपन आणि विविध अनुदान योजनांच्या माध्यमातूनही संघाकडून मदत केली जात आहे.
दिवाळीपूर्वी दूध उत्पादक सभासदांना दर फरकाची रक्कम अदा करून त्यांचा सण गोड करावा, असे आवाहन गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी दूध संस्थांना केले आहे.
‘गोकुळ’ची दूध उत्पादकांना दिवाळी भेट! ११७ कोटींचा दूध दर फरक खात्यावर जमा!
|