शैक्षणिक

शेंडूरच्या शिरपेचात मानाचा तुरा गायत्री इंगळेंनी UST मधून मिळवली पीएचडी

A Proud Moment for Shendur as Gayatri Ingle Completes PhD at UST


By nisha patil - 6/19/2026 11:13:50 AM
Share This News:



शेंडूर (ता. कागल) : शेंडूर गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, येथील रहिवासी डॉ. गायत्री उदयसिंह इंगळे (निंबाळकर) यांनी दक्षिण कोरियातील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (UST) मधून हायड्रोजन प्रॉडक्शन (Hydrogen Production) या विषयात पीएच.डी. पदवी यशस्वीरित्या संपादन केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ऊर्जा क्षेत्रातील भविष्यातील महत्त्वाचा विषय मानल्या जाणाऱ्या हायड्रोजन निर्मितीवर त्यांनी संशोधन केले असून, त्यांच्या संशोधनामुळे शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेंडूर परिसरातून परदेशात जाऊन पीएच.डी. प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या संशोधक ठरल्याने गावाच्या शैक्षणिक इतिहासात त्यांच्या नावाची विशेष नोंद झाली आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर नवा आदर्श निर्माण झाला असून, उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात करिअर घडविण्याची प्रेरणा अनेकांना मिळणार आहे.

डॉ. गायत्री इंगळे यांच्या यशामागे कुटुंबीयांचे पाठबळ आणि मार्गदर्शकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अजय सुनील निंबाळकर आणि सुनील खंडेराव निंबाळकर यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सक्षम झाला.

त्यांच्या या यशाबद्दल शेंडूर ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


ग्रामीण भागातून जागतिक संशोधनापर्यंत गायत्री इंगळेंची प्रेरणादायी भरारी
Total Views: 64