मनोरंजन

पन्हाळगडावर भक्तिभाव आणि ऐक्याचा सुंदर संगम

A beautiful confluence of devotion and unity at Panhalgad


By nisha patil - 6/27/2026 11:56:47 AM
Share This News:



प्रतिनिधि : शहवाज मुजावर 

मोहरम च्या निमित्ताने पन्हाळागडावर हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक पाहायला मिळाले. या निमित्ताने पन्हाळागदावरचे वातावरण अतिशय भक्तिमय स्वरूपाचे होते. दहा दिवस चालणाऱ्या या सणाला भावनिक अंत्यकरणाने निरोप दिले गेले. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला मोहरम उत्सव आज अत्यंत भक्तीपूर्ण आणि शोकमय वातावरणात संपन्न झाला.

गुरुवारी रात्री मुख्य ‘खत्तल रात्र’ पार पडली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी हैदर मशीद येथे २.३० वाजता मोहर, बारा इमाम दर्गा मशीद येथे ४.४५ वाजता मोहर दफन विधी पार पडला. पन्हाळा येथील हजरत पीर शहादुद्दीन दर्या दर्ग्यातील शेवटचा मोहर दफन विधी सायंकाळी ६.१५ वाजता सादोबा तलाव दर्गा मशिदीत पार पडला.

गडावरील नाला हैदर पंजा, बाराईमाम येथील गवंडी पंजा, कासे पंजा, आगा पंजा तसेच बाजीप्रभू पुतळा परिसरातील कांबळे पंजा, भोसले पंजा, मोकाशी पंजा यांच्यासह पावनगड, मंगळवारपेठ, सोमवारपेठ, आपटी, रविवारपेठ, नेबापूर आणि रामापूर येथील सर्व पंजे आज दुपारी पन्हाळगडावर एकत्र आले.विसर्जनावेळी पंजाचे साहित्य घेऊन भाविक संबंधित मशिदींकडे जात असताना “अलविदा या शहा-ए-शहीदा” या भावनिक नोह्याचे पठण करण्यात आले.

इमाम हुसैन यांच्या शहादतीच्या आठवणींनी उपस्थितांचे डोळे पाणावले आणि मोहरमचा समारोप अत्यंत भावनिक वातावरणात झाला.संपूर्ण कार्यक्रमादरम्यान पन्हाळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, त्यामुळे उत्सव शांततेत पार पडला. रविवारी संध्याकाळी जियारत विधी होणार असल्याची माहिती दर्गा ट्रस्टी अब्दुलसत्तार मुजावर, जमीर मुजावर आणि सद्दाम मुजावर यांनी दिली. या वेळी परिसरातील हिंदू आणि मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे पन्हाळगडावर पुन्हा एकदा ऐक्य, श्रद्धा आणि परंपरेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

 


पन्हाळगडावर मोहरमचा भावनिक समारोप | हिंदू–मुस्लिम ऐक्याचे दर्शन | पन्हाळा बातमी
Total Views: 17