बातम्या

ताडोबाहून सह्याद्रीकडे ‘चंदा’चा ८५० किमीचा प्रदीर्घ प्रवास : वाघ संवर्धनाकडे मोठे पाऊल

A big step towards tiger conservation


By nisha patil - 11/14/2025 1:30:49 PM
Share This News:



ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘चंदा’ या वाघिणीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली असून, पश्चिम घाटातील वाघ संवर्धनासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

केंद्र सरकारच्या ‘ऑपरेशन तारा’ अंतर्गत आठ वाघांचे ताडोबा आणि पेंच येथून टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्याचे नियोजन केले असून, त्यातील पहिली निवड ‘चंदा’वर झाली. बुधवारी रात्री उशिरा ताडोबाच्या बफर क्षेत्रातून तिला पकडून ‘रेडिओ कॉलर’ बसवण्यात आला आणि वन्यजीव रुग्णवाहिकेद्वारे तिचा ८५० किलोमीटरचा प्रवास सुरू झाला.

नांदेड येथे विश्रांती घेतल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री हा ताफा सह्याद्रीत पोहोचणार आहे. ताडोबातील प्रसिद्ध वाघ ‘छोट्या मटक्या’ची मुलगी आणि ‘वाघडोह’ची नात असलेली चंदा सध्या गर्भवती असून तिचे मीलन जून महिन्यात ‘बाली’ या नर वाघासोबत झाले होते.

सध्या सह्याद्रीत तीन नर वाघ असल्याने प्रजनन वाढीसाठी चंदाच्या आगमनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पुढील काही दिवस तिला विलगवासात ठेवून नंतर नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल आणि ‘रेडिओ कॉलर’द्वारे तिच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जाईल. लवकरच दुसरी निवड झालेली ‘चांदणी’ ही वाघिणीसुद्धा सह्याद्रीत आणण्याची तयारी सुरू आहे.

वाघांची संख्या घटलेल्या सह्याद्री प्रकल्पात अधिवास पुनरुज्जीवन आणि प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी हे स्थलांतर महत्त्वाचे मानले जात आहे.


ताडोबाहून सह्याद्रीकडे ‘चंदा’चा ८५० किमीचा प्रदीर्घ प्रवास : वाघ संवर्धनाकडे मोठे पाऊल
Total Views: 51