शैक्षणिक
व्यंकटराव शिक्षण संकुलात एस. एस. सी. विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा समारंभ संपन्न
By nisha patil - 2/18/2026 3:06:43 PM
Share This News:
व्यंकटराव शिक्षण संकुलात एस. एस. सी. विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा समारंभ संपन्न..
आजरा(हसन तकीलदार) :- येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम जयवंतराव शिंपी (अध्यक्ष आजरा महाल शिक्षण मंडळ,आजरा) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा पटेकर, सचिव अभिषेक शिंपी, संचालक पांडुरंग जाधव, सचिन शिंपी, सुधीर जाधव, विलास पाटील उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात जयवंतराव शिंपी यांनी सांगितले की, विद्यार्थी मित्रानो आपल्या शालेय जीवनामध्ये आपण आई-वडील आणि गुरुजन वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली आपले ध्येय निश्चित करून अभ्यासाला लागा.त्या क्षणासाठी मेहनत करा ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला म्हणाल कठीण होतं पण मी करून दाखवलं यातून तुमचा आत्मविश्वास तर निश्चित वाढणारच त्याचबरोबर या देशाला एक होतकरू अभ्यासू, जिद्दी आणि मेहनती युवक मिळेल.ज्याच्या खांद्यावर देशाचे भविष्य आहे.
उपाध्यक्ष कृष्णा पटेकर यांनी विद्यार्थ्यांना, लहानपण मनापासून जगा कारण या वयात आपल्याला प्रौढ माणसाप्रमाणे कोणतीच जबाबदारी नसते त्यामुळे आवडणारे क्षेत्र निवडा आणि त्यात आपले करिअर करा आत्मचिंतन करा असे मार्गदर्शन केले
सचिव अभिषेक शिंपी यांनी ज्ञान ,भक्ती व विवेक यातील विवेक किती महत्त्वाचा आहे आणि तो विवेक पेरण्याचे कार्य या प्रशालेमध्ये केले जाते. ते सर्वांनी अंगीकारले पाहिजे. चांगल्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे . जीवनात येणाऱ्या अनेक परीक्षांना न घाबरता सामोरे गेले की यश निश्चित मिळते. तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व आणि आपले पुढील इंजिनियर, डॉक्टर, तसेच विविध क्षेत्रातील अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करणेकामी लागणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी आपल्या व्यंकटराव प्रशालेमध्ये अकॅडमी वर्ग सुरू केलेले आहेत त्यामुळे या सेवेचा आणि संधीचा प्रशालेतील विद्यार्थ्याबरोबरच तालुक्यातील विद्यार्थ्यांनीही लाभ घेतला तर त्यांचे भविष्य निश्चित उज्वल होईल असे म्हणाले.
प्राचार्य एम.एम. नागुर्डेकर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला तणावमुक्त व धैर्याने सामोरे जाणे आवश्यक असल्याचे सांगितले तसेच यावर्षीपासून शासनाच्या या परीक्षे संदर्भातील विविध नियमावलींची माहिती करून दिली.
शिक्षक मनोगतामध्ये व्हि.एच.गवारी यांनी सांगितले की, पूर्वी गुरूंच्या सानिध्यामध्ये त्यांचे घरी राहून शिक्षण घेतले जात होते. आज मात्र फक्त पाच तासासाठी विद्यार्थी शाळेच्या संपर्कात राहतात. अभ्यास करण्यासाठी त्यांना भरपूर वेळ मिळतो. त्याचा त्यांनी फायदा करून घेणे गरजेचे आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बारा ते अठरा तास अभ्यास करून विद्यार्थ्यांसमोर यशस्वी आदर्श ठेवला आहे. तो सर्व विद्यार्थ्यांनी अंगीकारणे महत्त्वाचे आहे.
विद्यार्थी मनोगतामध्ये प्रणव पाटील, सिमरन पाटील, माधवी आजगेकर, दिशा पाटील व शलाका गिरी यांनी आपले शाळेप्रती विचार मांडले. तसेच इयत्ता नववीतील विद्यार्थिनी सानवी चौगुले हिने या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या शुभेच्छा समारंभात शाळेतील इंग्रजी विषय शिक्षकांनी सर्वांसाठी सामान्यज्ञान परीक्षेचे आयोजन केले होते त्यात संपूर्ण शाळेतील जवळजवळ 600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यातील प्रथम तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला दोन टेबल भेट म्हणून दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती एस.टी.पाटील व सूत्रसंचालन श्रीमती आर. एन. पाटील यांनी केले, व आभार श्रीमती एम. व्ही.बिल्ले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका सौ.व्ही. जे.शेलार, इयत्ता दहावीचे सर्व वर्गशिक्षक, सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
व्यंकटराव शिक्षण संकुलात एस. एस. सी. विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा समारंभ संपन्न
|