बातम्या
संकटातून संकल्पाकडे नेणाऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडला
By nisha patil - 11/20/2025 5:46:41 PM
Share This News:
संकटातून संकल्पाकडे नेणाऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडला
पुणे: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग तथा उच्च शिक्षण संचालनालय, पुणे आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या माॅडर्न कॉलेज, शिवाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संकटातून संकल्पाकडे’ या सन्मान सोहळ्याचे आयोजन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. महाराष्ट्रातील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या महाविद्यालयांच्या उल्लेखनीय सेवेला या सोहळ्यात गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डा. सुरेश गोसावी, उच्च शिक्षण संचालक डा. शैलेंद्र देवळाणकर, प्रो. ए. सोसायटीचे कार्याध्यक्ष डा. गजानन एकबोटे, तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे उपस्थित होते.
अवर्षणाचा फटका बसलेल्या महाविद्यालयांना मदत करण्यासाठी राज्यातील विविध महाविद्यालयांनी पुढाकार घेतला. दिवाळीपूर्वीच आवश्यक सुविधा आणि मदत पुरवण्यासाठी महाविद्यालयांनी गावोगावी भेटी देत संवेदनशील कार्य केले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांनी यामध्ये महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला. या सामाजिक कार्याचा आज पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे सन्मान करण्यात आला.
या उपक्रमात दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी यांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेतला. त्यांच्या या कार्याचा सन्मानही समारंभात करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीताने झाली.
सत्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना दादा पाटील म्हणाले, “मराठवाड्यातील कठीण परिस्थितीत महाविद्यालयांनी केलेली मदत अनुकरणीय आहे. ही प्रेरणा टिकावी म्हणून या कार्याचे दस्तऐवजीकरण असलेले पुस्तक प्रकाशित करत आहोत. समाजसेवा संवेदनशीलतेने केली तरच परिणामकारक ठरते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून असे कार्य पुढेही सुरू राहावे.”
तसेच २०४७ पर्यंत भारताला ‘विश्वगुरु’ बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर भाष्य करत त्यांनी महाविद्यालयांचे सामाजिक योगदान दिशादर्शक असल्याचे सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डा. शंकर खाडे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विद्यार्थ्यांनी इचलकरंजी शहरात रॅली काढून नागरिकांकडून मदत गोळा केली. जमा रक्कम सोलापूर येथील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या उपक्रमात NSS व NCC विद्यार्थी, कार्यक्रम अधिकारी डा. अजिंक्य पत्रावळे, डॉ. सुनील भोसले, सौ. पूजा पारिशवाड, प्रा. संदीप पाटील, डॉ. सारिका पाटील, प्रा. निलेश जाधव आणि कॅ. विनायक भोई यांनी मोलाची भूमिका बजावली.
संकटातून संकल्पाकडे नेणाऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडला
|