बातम्या
हेरिटेजवाडीतील खुनाचा थरार! जान्हवी किल्लेकर-आदिनाथ कोठारेचा 'मिरांडा वॉर्निंग' २७ नोव्हेंबरला प्रदर्शित
By nisha patil - 5/10/2026 11:11:21 PM
Share This News:
हेरिटेजवाडीतील खुनाचा थरार! जान्हवी किल्लेकर-आदिनाथ कोठारेचा 'मिरांडा वॉर्निंग' २७ नोव्हेंबरला प्रदर्शित
(कोल्हापूर प्रतिनिधी: अजित बोडके) : मालिका आणि चित्रपटांतील अभिनयाद्वारे घरोघरी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आता 'मिरांडा वॉर्निंग' या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अत्यंत रंजक भूमिकेतून जान्हवी सिने रसिकांसमोर येत असून, हा चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
सतनाम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मुव्हीज यांच्या निर्मितीतील या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती सचिन धोत्रे यांनी केली आहे. अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंटचे सुशीलकुमार अग्रवाल आणि सुकल्प चित्राच्या कल्पक जोशी यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. सचिन धोत्रे यांनी यापूर्वी २०२३ मध्ये 'गेट-टुगेदर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर आता 'मिरांडा वॉर्निंग'मधून त्यांनी वेगळा प्रयोग केला आहे. रवींद्र मठाधिकारी आणि सायली मठाधिकारी यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे.
हेरिटेजवाडी नावाच्या फार्महाऊसवर एका खुनाची घटना उघडकीस येते आणि त्यानंतर एक थरारक शोध सुरू होतो. या शोधात नेमकं काय काय घडतं, याची रंजक गोष्ट 'मिरांडा वॉर्निंग'मध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपटात आदिनाथ कोठारे एका रफटफ पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत यापूर्वी सस्पेन्स, थ्रिलर प्रकारातील चित्रपट आले असले तरी, 'मिरांडा वॉर्निंग'मधून उत्कृष्ट कथानक, कसलेले कलाकार आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम अशी कलाकृती पाहायला मिळणार असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे.
'भाग्य दिले तू मला' या लोकप्रिय टीव्ही मालिकेतून आणि 'सायको रंगा' सारख्या चित्रपटातून जान्हवीनं तिच्यातील अभिनेत्रीचं दर्शन घडवलं आहे. बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून तिची लोकप्रियता आणखी वाढली. आता जान्हवी पुन्हा एकदा सक्षम अभिनेत्री म्हणून या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येत आहे. तिची भूमिका नेमकी काय आहे, याबद्दलही सध्या प्रचंड उत्सुकता आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी मात्र २७ नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
हेरिटेजवाडीतील खुनाचा थरार! जान्हवी किल्लेकर-आदिनाथ कोठारेचा 'मिरांडा वॉर्निंग' २७ नोव्हेंबरला प्रदर्शित
|