बातम्या
अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा व महात्मा गांधी जयंतीनिमित्त आजरा महाविद्यालय व संस्थेच्या शैक्षणिक संकुलात स्वच्छता अभियान उत्साहात
By nisha patil - 1/10/2026 2:48:44 PM
Share This News:
अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा व महात्मा गांधी जयंतीनिमित्त आजरा महाविद्यालय व संस्थेच्या शैक्षणिक संकुलात स्वच्छता अभियान उत्साहात
*आजरा(हसन तकीलदार): अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता, स्वच्छ परिसर आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत जनता शिक्षण संस्था संचलित आजरा महाविद्यालय, आजरा हायस्कूल, रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर, अण्णाभाऊ इंग्लिश मीडियम स्कूल व आदर्श बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी गांधी जयंतीच्या पूर्व संध्येला स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात येते.त्यानुसार स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
या स्वच्छता मोहिमेअंतर्गत आजरा महाविद्यालय परिसर, आजरा पोलीस स्टेशन, एस.टी. डेपो, पंचायत समिती परिसर, मोरजकर महाराज समाधी परिसर व घाट परिसर, एस.टी. स्टँड तसेच शिवतीर्थ परिसर आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसरातील कचरा गोळा करून स्वच्छता केली. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे, स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जनता शिक्षण संस्थेचे सचिव रमेश कुरुणकर व संचालक अनिकेत चराटी यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेसाठी वापरण्यात येणाऱ्या अवजारांचे व साहित्याचे पूजन करून अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कनिष्ठ विभागाचे एनएसएस प्रकल्प अधिकारी प्राध्यापक रत्नदीप पवार यांनी स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी उपस्थितांनी स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम न राहता ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनावी, असा संदेश दिला.
या स्वच्छता अभियानात आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण पोतदार, उपप्राचार्य प्रा. डी. पी. संकपाळ, पर्यवेक्षक मनोज पाटील, अधीक्षक योगेश पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध परिसरांची स्वच्छता केली.
महात्मा गांधी यांनी स्वच्छतेला सामाजिक परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण साधन मानले होते. त्यांच्या स्वच्छ भारताच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देत आयोजित करण्यात आलेल्या या अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक जबाबदारी आणि सार्वजनिक मालमत्तेबद्दलची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन आजरा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन. एस. एस) विभागामार्फत करण्यात आले. अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छ परिसर, सुंदर परिसर’चा संदेश देत स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित या स्वच्छता अभियानामुळे आजरा शहरातील विविध सार्वजनिक परिसर स्वच्छ झाले असून, सामाजिक बांधिलकी आणि सामूहिक सहभागाचा आदर्श या उपक्रमातून निर्माण झाला. कार्यक्रमाचे आभार वरिष्ठ विभागाचे एन.एस.एस. प्रकल्प अधिकारी डॉ. अविनाश वर्धन यांनी मानले.
अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा व महात्मा गांधी जयंतीनिमित्त आजरा महाविद्यालय व संस्थेच्या शैक्षणिक संकुलात स्वच्छता अभियान उत्साहात
|