मनोरंजन

लोककलांच्या जतन व संवर्धनासाठी समिती स्थापन करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

A committee should be formed for the preservation and promotion of folk arts


By nisha patil - 10/29/2025 12:10:21 PM
Share This News:



मुंबई, दि. २८ : राज्यातील लोककला, लोकसंस्कृती आणि पारंपरिक कलांच्या जतन व संवर्धनासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी, अशी सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

विधानभवनात “लोककलावंतांच्या समस्या, आव्हाने आणि उपाययोजना” या विषयावर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. विभिषण चवरे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, लोककला अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, सुशांत शेलार, लोककलावंत नंदेश उमप, डॉ. भावार्थ देखणे आणि खंडूराज गायकवाड उपस्थित होते.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात विविध लोककला हा अमूल्य वारसा आहे. मात्र, या कलांना आधुनिक काळात आवश्यक प्रोत्साहन आणि संरक्षण मिळणे गरजेचे आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, सांस्कृतिक कार्य विभागाने लोककलांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी. या समितीमार्फत लोककलांचे संहितीकरण, संकलन, तसेच लोककलांसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे संग्रहालय स्थापनेचे काम हाती घेता येईल. तसेच राज्यभर विविध लोककला महोत्सव व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचे नियोजनही या समितीमार्फत करता येईल.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, “लोककलावंतांच्या समस्या आणि आव्हाने सोडवण्यासाठी समितीची स्थापना अत्यावश्यक आहे. या समितीच्या माध्यमातून शिक्षण विभागाशी समन्वय साधून लोककला विषयक प्रमाणपत्र कोर्सेस राबविण्याचे नियोजन करण्यात येईल. तसेच लोककलावंतांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातील.”

बैठकीत उपस्थित लोककला अभ्यासक आणि लोककलावंतांनीही आपले विचार मांडले आणि लोककलांच्या प्रोत्साहनासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.


लोककलांच्या जतन व संवर्धनासाठी समिती स्थापन करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Total Views: 88