बातम्या
करनूरमधील स्वतःच्या शेतावरील गाई- म्हशींच्या गोठ्याला दिली भेट□
By nisha patil - 11/21/2026 1:00:05 PM
Share This News:
गोकुळ दूध संघामार्फत म्हशीच्या दुधाला ३ रुपये आणि गाईच्या दुधाला २ रुपये दरवाढ दिल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी मानले संचालकांचे आभार□
करनूरमधील स्वतःच्या शेतावरील गाई- म्हशींच्या गोठ्याला दिली भेट□
करनूर, दि. २१: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दूध संघाने म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ३ रुपये आणि गाईच्या दुधाला प्रतिलिटर २ रुपये, अशी दूध खरेदी दरात वाढ केली आहे. त्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाचे आभार मानले. दुष्काळाच्या या भयानक स्थितीतही दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे त्यांनी मनापासून स्वागत केले आहे.
मंत्री श्री. मुश्रीफ यांनी करनूर ता. कागल येथील स्वतःच्या शेतावर असलेल्या गाई - म्हशींच्या गोठ्याला भेट देऊन पाहणी केली. या गोठ्यात लहान-मोठी अशी जवळजवळ ८५ ते ९० जनावरे आहेत. दररोज २५० लिटरहून अधिक दूध गोकुळ दूध संघाला आम्ही पाठवतो. शेतीसह या गोठ्यामध्ये मी स्वतः लक्ष घालत असतो, असेही ते म्हणाले.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, दूध संकलन वाढीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने परराज्यातील दुधाळ म्हशींच्या खरेदीसाठी १०,००० रुपये अनुदान दिले जाते. ते वाढवून २०,००० रुपये करण्याचा मनोदय तीन महिन्यांपूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलून दाखविला होता. त्याची अंमलबजावणी करणे तसेच गोकुळ दूध संघालाही अनुदान वाढवायला लावण्यासाठी प्रयत्न करणे या गोष्टी करणार आहोत. गोकुळ दूध संघानेही दुधाळ म्हैस खरेदीचे अनुदान वाढवावे, अशीही मागणी आहे. दरम्यान, अनुदान वाढविल्यानंतर म्हैस खरेदीचे दरही वाढतात. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्याला बिनव्याजी कर्ज देण्यासाठीही संघाने प्रयत्न करावेत, अशी दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. यामध्ये ज्या योजनेत दूध उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा असेल ती योजना राबवावी, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले. याचा सुवर्णमध्य काढून गोकुळचे संचालक मंडळ जो पर्याय सुचवतील तो आम्हाला केडीसीसी बँकेत मान्य असेल.
□ दुधाला सोन्याचा भाव येईल.......!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती तशी जरा बरी आहे. आपल्याकडे पाणी असल्यामुळे ओल्या चाऱ्याची उपलब्धता होऊ शकते. राज्यातील दुष्काळामुळे येणाऱ्या काळात मुंबई, पुणे या महानगरांसह इतर मोठ्या शहरांतही दुधाचा पुरवठा कमी होण्याची शक्यता वाटते. त्यामुळे दुधाला सोन्याचा भाव येईल.
करनूरमधील स्वतःच्या शेतावरील गाई- म्हशींच्या गोठ्याला दिली भेट□
|