विशेष बातम्या
“धर्म–परंपरा–पराक्रमाची महायात्रा; शंभू तीर्थातून शहरात उसळली शिवशक्ती”
By nisha patil - 10/12/2025 4:33:10 PM
Share This News:
“धर्म–परंपरा–पराक्रमाची महायात्रा; शंभू तीर्थातून शहरात उसळली शिवशक्ती”
शंभू तीर्थाच्या लोकार्पणाच्या निमित्त रविवारी इचलकरंजीत इतिहास, परंपरा आणि श्रद्धेचा संगम घडवणारा भव्य सोहळा पार पडला. तब्बल एक हजारांहून अधिक ढोल-ताशांच्या गजरात हजारो भक्तांनी छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना दिली. स्वयंभू, शिव शंभू, ब्रह्मांडनायक, केसरी, हिंदवी स्वराज्य, शिवप्रेमी, वाद्य संस्कार आदी प्रसिद्ध पथकांनी दमदार परफॉर्मन्स देत वातावरण दणाणून टाकले. युवक-युवती आणि महिलांच्या पारंपरिक ढोलवादनाने संपूर्ण परिसर शिवमय झाला.
शंभू तीर्थापासून महात्मा गांधी चौकापर्यंतचा परिसर जनसागराने फुलून गेला होता. प्रारंभी स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाजन यांच्या हस्ते ध्वजपूजन झाले. आमदार राहुल आवाडे यांनी ढोलपूजन तर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शस्त्रपूजन केले. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.
माय फाउंडेशनतर्फे 10 हजार लाडू प्रसादाचे वितरण करण्यात आले, तर विविध संघटनांनी पाण्याची सोय केली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या धारकऱ्यांनी संपूर्ण नियोजन सांभाळले. सकाळी झालेल्या धर्मरक्षा महायज्ञात हजारो नागरिकांनी राष्ट्रभक्ती, धर्मरक्षण आणि गौसेवेची शपथ घेतली. महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते महायज्ञ पार पडला, तर समारोप आमदार राहुल आवाडे यांनी केला. ब्राह्मण युवा मंच, इचलकरंजी यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमादरम्यान ‘गौरी’ नावाच्या गाईचे पूजनही करण्यात आले.
या भव्य सोहळ्यामुळे इचलकरंजी शहरात धर्म, पराक्रम, संस्कृती आणि शिवभक्तीची ऊर्जा पुन्हा जागृत झाली.
“धर्म–परंपरा–पराक्रमाची महायात्रा; शंभू तीर्थातून शहरात उसळली शिवशक्ती”
|