बातम्या

गोकुळमध्ये अध्यक्षपदाच्या निवडीआधीच 'लेटर बॉम्ब'! मंत्री चंद्रकांत पाटलांच्या पत्राने राजकीय खळबळ!

A letter bomb in Gokul even before


By nisha patil - 2/11/2026 3:08:36 PM
Share This News:



गोकुळमध्ये अध्यक्षपदाच्या निवडीआधीच 'लेटर बॉम्ब'! मंत्री चंद्रकांत पाटलांच्या पत्राने राजकीय खळबळ!

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघात अध्यक्षपदाची खुर्ची अजून रिकामीच... १३ विरुद्ध १२ च्या सत्तासंघर्षात अध्यक्ष निवडीचा पेच कायम असतानाच आता समोर आलाय एक मोठा 'लेटर बॉम्ब'! आणि या पत्रामुळे गोकुळच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. तीन हजार कोटी रुपयांहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाची संख्या वाढवण्याची मागणी करणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पत्र सध्या चर्चेत आले आहे.

१६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र लिहिल्याचा दावा केला जात आहे. या पत्रात तीन हजार कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर सध्या असलेल्या दोन शासकीय नामनिर्देशित संचालकांची संख्या चार करावी, तर संस्थेकडून नामनिर्देशित केल्या जाणाऱ्या संचालकांची संख्याही दोनवरून चार करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

इतकंच नाही, तर यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करून आगामी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव आणण्याची विनंतीही करण्यात आली आहे. शासननियुक्त संचालकांना व्यापक अधिकार देण्याचाही मुद्दा या पत्रात मांडण्यात आला आहे. आता विशेष बाब म्हणजे, गोकुळची वार्षिक उलाढाल तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या पत्राचा थेट संबंध गोकुळशी जोडला जात असून, संचालक मंडळाची संख्या २५ वरून ३३ होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीत समविचारी आघाडीला १३, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या आहेत. मात्र अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक १४ सदस्यांचा कोरम पूर्ण न झाल्याने निवड प्रक्रिया रखडली आहे. अशातच लिहिलेलं हे पत्र आता व्हायरल झाल्याने गोकुळमध्ये नेमका कोणता नवा राजकीय डाव शिजतोय? संचालक मंडळाची संख्या वाढवण्यामागे नेमकं कारण काय? आणि या पत्राचा अध्यक्षपदाच्या सत्तासंघर्षावर काय परिणाम होणार? याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.


गोकुळमध्ये अध्यक्षपदाच्या निवडीआधीच 'लेटर बॉम्ब'! मंत्री चंद्रकांत पाटलांच्या पत्राने राजकीय खळबळ!
Total Views: 15