बातम्या
ऊस दरासाठी 'स्वाभिमानीच्यावतीने रविवारी कोल्हापुरात राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली भव्य मोटारसायकल रॅली.
By nisha patil - 10/21/2026 6:44:32 PM
Share This News:
ऊस दरासाठी 'स्वाभिमानीच्यावतीने रविवारी कोल्हापुरात राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली भव्य मोटारसायकल रॅली.
कोल्हापूर: (प्रतिनिधी) चालू गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊसाला योग्य पहिली उचल जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली आहे. संघटनेचे मुख्य नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली येत्या रविवारी २५ ॲाक्टोंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यात भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस दराचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि प्रशासनाला इशारा देण्यासाठी काढण्यात येणारी ही रॅली प्रामुख्याने हातकंणगले येथून सकाळी ९ .३० वाजता सुरवात करून कुंभोज , नरंदे , वडगांव , वारणा कारखाना , माले , वाघबीळ , पोर्ले , पडळ , कुंभी कारखाना , महे , परिते , बिद्री कारखाना , वाळवा , खेबवडे , बामणी , सिध्दनेर्ली ,कागल वरून कसबा सांगाव चावडी चौक याठिकाणी सभा घेऊन रॅलीची सांगता करण्यात येणार आहे.
या भागातील हजारो ऊस उत्पादक शेतकरी आपल्या मोटारसायकलसह या रॅलीत सहभागी होणार असून, ऊस दराच्या मुद्द्यावर शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या सीमाभागात ऊस दरासाठी संयुक्त आंदोलन सुरू आहे. कर्नाटक राज्यातील आंदोलनाची तीव्रता पाहता, तेथील मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्वतः आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन मध्यस्थी केली आहे. सीमाभागातील तोडग्यासाठी त्यांनी सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी बेळगाव विधानसभा येथे साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक बोलावली आहे
दुसरीकडे, केंद्र सरकार २० नोव्हेंबरच्या आत साखरेची किमान विक्री किंमत (MSP) निश्चित करणार असल्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले आहे. केंद्राच्या या सकारात्मक पवित्र्यामुळे आणि डी. के. शिवकुमार यांच्या मध्यस्थीमुळे कर्नाटकातील कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
शेजारील राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घालत आहेत, त्याच धर्तीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तातडीने राज्यातील साखर कारखान्यांना ऊस दर जाहीर करण्यास भाग पाडावे आणि गळीत हंगाम योग्य दराने सुरू करण्याबाबत चर्चा करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलने सुरू केली जाणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष अजित पोवार , धनाजी पाटील , राजेंद्र गड्यान्नावर , राजाराम देसाई, डॅा. बाळासाहेब पाटील , विशाल चौगुले , जयकुमार कोले , सचिन शिंदे , बाजीराव पाटील , तानाजी मगदूम , दिपक पाटील , तानाजी देसाई , सखाराम केसरकर , महेश पांडव यांचेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ऊस दरासाठी 'स्वाभिमानीच्यावतीने रविवारी कोल्हापुरात राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली भव्य मोटारसायकल रॅली.
|