बातम्या
गोकुळचा कौल डावलण्याचा डाव? सतेज पाटील यांचे पत्रकारांना साकडे!
By nisha patil - 3/11/2026 3:44:24 PM
Share This News:
गोकुळचा कौल डावलण्याचा डाव? सतेज पाटील यांचे पत्रकारांना साकडे!
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी दिलेला स्पष्ट बहुमताचा कौल डावलून अध्यक्ष निवडीची प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्रातील सर्व संपादक आणि पत्रकारांना पत्र लिहून गोकुळमधील लोकशाहीचा लढा जनतेसमोर मांडण्याचे आवाहन केले आहे.
गोकुळच्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागांवर समविचारी आघाडीला बहुमत मिळाले. मात्र, २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या अध्यक्ष निवडीच्या सभेला महायुतीचे सर्व १२ संचालक गैरहजर राहिल्याने गणपूर्तीअभावी सभा तहकूब झाली. पराभव स्वीकारण्याऐवजी तांत्रिक कारणांचा आधार घेऊन सत्तास्थापनेची प्रक्रिया अडवली जात असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी पत्रातून केला आहे.
गोकुळमधील बहुमत बदलण्यासाठी कायद्यात बदल करण्याची किंवा शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन संख्याबळ बदलण्याची चर्चा लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज गोकुळमध्ये घडणारा प्रकार उद्या महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही घडू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, प्रशासकीय काळात संघाचा तोटा वाढत असताना दुष्काळ आणि चाऱ्याच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात नसणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. विरोधी संचालकांनीही दूध उत्पादकांचा कौल स्वीकारून पुढील सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
गोकुळचा हा संघर्ष केवळ अध्यक्षपदापुरता मर्यादित नसून सहकारातील लोकशाही आणि दूध उत्पादकांच्या मताधिकाराचा प्रश्न असल्याची भूमिका सतेज पाटील यांनी मांडली आहे.
गोकुळचा कौल डावलण्याचा डाव? सतेज पाटील यांचे पत्रकारांना साकडे!
|