ताज्या बातम्या
एका निसर्गप्रेमीची निसर्गाला वाचवण्यासाठी चाललेली धडपड कौतुकास्पद
By nisha patil - 12/21/2025 1:41:48 PM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- विकासाच्या नावावर निसर्गाला आज भकास केलं जात आहे. सिमेंटच्या जंगलात निसर्ग आपलं अस्तित्व गमावत चाललंय. सरकारच्या धोरणापुढे निसर्गप्रेमिंची गळचेपी होताना दिसत आहे. संकेश्वर - बांदा महामार्गाच्या वेळी शंभर दीडशेहे वर्षापूर्वीच्या झाडांची कत्तल होताना निसर्गप्रेमीना मुकाट्याने पहावे लागले. अनेक निसर्गप्रेमी हळहळताना दिसले.
पक्षांची विरासत नष्ट झाली आणि पक्षी पोरके झाले. आंबा, फणस, चिंच, शिसव, सावर, जांभूळ, वड, पिंपळ, पळस यासारख्या शंभर दीडशेहे वर्षांपूर्वीची झाडे नष्ट झाली आणि सरकारी बाबुनी फक्त कागदावर झाडे लावली. निसर्गाची अपरिमित हानी होत आहे. यावेळी निसर्गप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. धनाजी राणे यांनी येथील झाडांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु लोकशाही दांडूकशाहीच्या पुढे टिकली नाही. कित्येक झाडांची कत्तल होताना फक्त बघ्याची भूमिका घ्यावी लागली.
पुन्हा एकदा इंग्रजांच्या काळातील दीडशेह दोनशेहे वर्षांपूर्वीच्या झाडांचा बळी जाणार असं वाटतं. हलकर्णी, महागाव, चितळे, जेऊर, इब्राहिमपूर, चंदगड मार्गावरील दीडशेहे दोनशेहे वर्षांपूर्वीच्या झाडांचे बळी जाणार आहे. भल्या मोठ्या वडाच्या, पिंपळाच्या झाडामुळे अनेक फायदे असल्याचे डॉ. धनाजी राणे यांनी सांगितले. ज्याप्रमाणे पुणे- बेंगलोर महामार्ग बायपास करून वडाची, पिंपळाची झाडे वाचवली तशी येथीलही इंग्रजांच्या काळात लावलेली ही झाडे वाचवण्यासाठी आवाहन केले आहे. झाडांचं महत्व आणि कोरोना काळातील ऑक्सिजनचे महत्व समजून सरकारने याला पर्याय शोधावा. निसर्ग वाचला तरच मानव आणि जीवसृष्टी वाचणार आहे.निसर्गाचा बळी देऊन होणारा विकास मनुष्य प्राण्यांना घातक ठरणारा आहे यासाठी निसर्ग वाचवणे काळाची गरज बनली आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. निसर्गप्रेमिनी यासाठी आवाज उठवणे गरजेचे आहे.
एका निसर्गप्रेमीची निसर्गाला वाचवण्यासाठी चाललेली धडपड कौतुकास्पद
|