राजकीय

सीएसआर' निधीच्या उपयोगातून महाराष्ट्रात प्रगतीचा नवा अध्याय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

A new chapter of progress in Maharashtra through the use of CSR funds


By nisha patil - 5/21/2026 6:01:55 PM
Share This News:



सीएसआर' निधीच्या उपयोगातून महाराष्ट्रात प्रगतीचा नवा अध्याय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  टेक महा इम्पॅक्ट परिषदेचे आयोजन

 

मुंबई, दि. 20 : सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर)च्या माध्यमातून देशात दरवर्षी सुमारे 36 हजार कोटी रुपये खर्च केले जातात. हा निधी खर्च करण्यामध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. सीएसआर निधीच्या उपयोगातून समाजात शासकीय योजनांचा प्रभाव अनेक पटीने वाढवता येऊ शकतो. त्यामुळे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचत असून महाराष्ट्रात प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जात असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

 

हॉटेल प्रेसिडेंटच्या सभागृहात इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्यावतीने आयोजित टेक महा इम्पॅक्ट परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव परिमल सिंग, महा आयटीच्या आयुक्त भुवनेश्वरी एस, इलेक्ट संस्थेचे रवी गुप्ता, माहिती तंत्रज्ञान महामंडळाचे मुख्य परिचलन अधिकारी भगवान पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात सर्वाधिक सीएसआर निधी उपलब्ध होतो. या निधीचा मोठा हिस्सा मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात खर्च होतो. हा निधी केवळ काही विशिष्ट भागांपुरता मर्यादित न राहता या निधीच्या उपयोगातून संपूर्ण राज्यांमध्ये परिणामकारक काम होण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. 'व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन इनिशिएटिव्ह' उपक्रम अंतर्गत शासनाने सीएसआर भागीदारांच्या मदतीने एक हजार गावांचा कायापालट करून ती गावे 'शाश्वत विकास ध्येयांवर'  आधारित बनवली आहे. या अनुभवावरून स्पष्ट होते की, जेव्हा शासकीय यंत्रणा, व्याप्ती आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील लवचिकता, तंत्रज्ञान व संसाधने एकत्र येतात, तेव्हा सामाजिक क्षेत्रात 'गुणाकार प्रभाव' पाहायला मिळतो.

सीएसआर भागीदारांच्या लवचिकतेमुळे शासकीय योजनांमध्ये समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करून आवश्यक ते बदल करणे शक्य असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, टेक कंपन्या केवळ निधी देत नसून नवीन तंत्रज्ञान आणत आहेत, ज्यामुळे सीएसआर निधीचा वापर अधिक पारदर्शक आणि मोजता येण्याजोगा झाला आहे. कंपन्यांना त्यांच्या निधीचा थेट प्रभाव पाहायचा असतो. शासनासोबत भागीदारी करताना सीएसआर निधीतील प्रत्येक पैशाचा वापर थेट सर्वसामान्यांच्या कल्याणासाठीच केला जाईल. कोणत्याही अतिरिक्त व्यवस्थेवर किंवा पायाभूत सुविधेवर तो वाया जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या सर्व सीएसआर भागीदारांचे आभार मानत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र शासनासोबतचा हा प्रवास अत्यंत सुलभ आणि समृद्ध ठरेल. या परिषदेने सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू केला आहे.

 


सीएसआर' निधीच्या उपयोगातून महाराष्ट्रात प्रगतीचा नवा अध्याय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
Total Views: 3