बातम्या

गोकुळ अध्यक्ष निवडीत नवा ट्विस्ट! शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार

A new twist in the election of the Gokul chairman


By nisha patil - 4/11/2026 3:07:22 PM
Share This News:



गोकुळ अध्यक्ष निवडीत नवा ट्विस्ट! शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार

 

गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा सस्पेन्स आता आणखी वाढणार आहे. १० नोव्हेंबरला होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडीत आता शासन नियुक्त संचालकांची एन्ट्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तीन हजार कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर चार शासन नियुक्त संचालक नेमण्यास आणि त्यांना मतदानाचा अधिकार देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे गोकुळच्या सत्तासंघर्षात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या अध्यक्ष निवडीच्या सभेला महायुतीचे बारा संचालक गैरहजर राहिल्याने कोरमअभावी सभा तहकूब करण्यात आली होती. तर दुसरीकडे समविचारी आघाडीने स्वतंत्र बैठक घेत शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केली होती. या निवडीला वैधता मिळावी यासाठी सर्किट बेंचमध्ये याचिकाही दाखल करण्यात आली.

यानंतर सर्किट बेंचने १० नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे आदेश देत सर्व २५ निवडून आलेल्या संचालकांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
मात्र, आता या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. राज्यातील तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर शासन नियुक्त संचालकांची संख्या चार करण्यासह त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या प्रस्तावाला बुधवारी, ४ नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. आता राज्यपालांच्या मंजुरीनंतर यासंदर्भातील अध्यादेश जारी होणार आहे. गोकुळची आर्थिक उलाढाल लक्षात घेता या निर्णयाचा अध्यक्ष निवडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या समविचारी आघाडीकडे १३, तर महायुतीकडे १२ संचालक आहेत. अशातच शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार मिळाल्यास सत्तेचं गणित बदलू शकतं.

त्यामुळे १० नोव्हेंबरच्या सभेला महायुतीचे बारा संचालक उपस्थित राहणार का? शासन नियुक्त संचालकांची नेमणूक कधी होणार? आणि अखेर गोकुळच्या अध्यक्षपदाची खुर्ची कोणाला मिळणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


गोकुळ अध्यक्ष निवडीत नवा ट्विस्ट! शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार
Total Views: 10