बातम्या
राजेशाही थाट, परंपरेचा जागर! कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक उत्साहात संपन्न!
By nisha patil - 10/21/2026 1:22:15 PM
Share This News:
राजेशाही थाट, परंपरेचा जागर! कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक उत्साहात संपन्न!
राजेशाही थाट… पारंपरिक मिरवणूक… धनगरी ढोलांचा गजर आणि सोनं लुटण्यासाठी उसळलेला जनसागर! अशा उत्साहपूर्ण वातावरणात कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. विजयादशमीच्या निमित्ताने दसरा चौकात मावळत्या सूर्याच्या साक्षीने शमी पूजन आणि सोने लुटण्याचा पारंपरिक सोहळा पार पडला. यावेळी हजारो करवीरवासीयांनी उपस्थिती लावत या ऐतिहासिक परंपरेचा आनंद घेतला. सोनं घ्या… सोन्यासारखं रहा अशा शुभेच्छांसह आपट्याची पाने एकमेकांना देण्यात आली.
भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर निघालेल्या शाही मिरवणुकीत करवीर निवासिनी अंबाबाई आणि तुळजाभवानीच्या पालख्या, मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, धनगरी ढोल, महिलांचे लेझीम आणि पोवाड्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
सायंकाळी खासदार शाहू महाराज छत्रपती, युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील सदस्यांचे दसरा चौकात आगमन झाले. भालदारांच्या ललकारी, पोलिस बँड आणि शाही सलामीने सोहळ्याची रंगत आणखी वाढवली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने शमी पूजन करण्यात आले आणि बंदुकीच्या फैरी झाडून देवीला सलामी देण्यात आली. या सोहळ्याला लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
राजेशाही थाट, परंपरेचा जागर! कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक उत्साहात संपन्न!
|