शैक्षणिक
सेवा सोसायटीचा शिपाई झाला सहकार आयुक्तचा अधिकारी
By nisha patil - 8/28/2025 11:23:22 AM
Share This News:
सेवा सोसायटीचा शिपाई झाला सहकार आयुक्तचा अधिकारी
अखेर धोंडिबाने गाठले यशाचे शिखर
आजरा (हसन तकीलदार):-नितळ काळ्या पाषाणात पाण्याचा पाझर दिसावा अन मन सदगदीत व्हावं असे दृश्य असाणारी व एक थक्क करणारा प्रवास जेव्हा परिस्थिती वर मात करीत असहाय ते सहाय करणारा आणि जिद्दीने आपलं ध्येय गाठणाऱ्या धोडिंबा जाधवाची ही वास्तव कथा ग्रामिण भागातील आई वडिलासह शिक्षकाना आणि मराठी शाळेना बदनाम करण्याऱ्यांना एक चपराक असून, एमपीएसी च्या माध्ममातून सोसायटीचा शिपाई ते सहकार खात्याच्या अधिकारी पदाला गवसणी घालणारा प्रवास. इतरांना आणि आजच्या ग्रामीण युवकांना एक आदर्शवत आहे. युवकांनीही याचे अनुकरण केले तर यश तुमच्या पायाशी नक्कीच आहे.
आजरा तालुक्यातील चाळोबा डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या मलिग्रे या ग्रामीण भागात अत्यंत गरीब परस्थितीतून शिक्षण घेत असताना, सर्वसामान्य मुलांप्रमाणे नववी पर्यंत शिक्षण घेत कधीही नापास नाही पण घरच्या कामातून अभ्यास कडे लक्ष द्यायला वेळ नाही. अशा परिस्थिती दहावीच्या बोर्डाचा फॉर्म भरायला शिक्षकानी विरोध केला. हा शाळेत नियमित येत नाही, सांगितलेला अभ्यास करीत नाही, फॉर्म भरला तर शाळेची टक्केवारी कमी येणार, या पेक्षा याचा फॉर्म न भरलेला बरा, अशी शिक्षकानी खुणगाठ बांधली होती. पण धोंडिबाच्या मनात शिक्षणा विषयी प्रचंड आवड होती. कामातून सवड काढुन अभ्यासाला वेळ देता येत नाही, याचे प्रचंड दुःख होते. त्याने आपल्या आईला सोबत घेवून, शिक्षकांना फॉर्म भरायला भाग पाडले.
परीक्षा काळात मेहनत घेतली असली तरी, निकाला दिवसी मनाची धाकधुक वाढलेली होती. शेजारच्या दादाने तो पास झाल्याचे सांगितलं अन दोन फटाकाच्या माळा लावल्या, त्या आनंदात धोंडिबाला सदतीस टक्के मार्क घेऊन पास झाल्याचे समजले, पण खात्रीने अभ्यास करणारे मित्र मात्र नापास झाल्याने वाईट वाटले. पुढील शिक्षणा पेक्षा कोठे तरी नोकरी करावी म्हणून, चंदगड येथे हॉटेल मध्ये चार दिवस काम करून मालकाला पगाराचे विचारले तर एक महिना काम पाहून पगार दिला जाईल असे सांगण्यात आले. हे एकून परत गावात येवून आजरा येथील टु व्हिलर मॅकॅनिकच्या हाताखाली काम केले, परंतू सहा महीन्यात त्याचा धंदा बंद झाल्याने परत मोठे संकट आले. खचून न जाता मिळेल ती कामे करू लागला.
आकरावी साठी प्रवेश घेऊन, नियमित कॉलेज करणेसाठी मिळेल ते काम करावे लागले. ट्रॅक्टरवर वाळू, खडी, शेणखते भरणे, सिमेंट विटा तयार करणे, इत्यादी अंगमेहनतीची कामे करीत असताना, विकास सेवा सोसायटीत शिपाई म्हणून महिना पाचशे रूपये पगाराची नोकरी मिळाली. सकाळी सोसायटी झाडून काढणे, पाणी भरणे, सभासदांना निरोप देणे व साहेबाची वाट पहाणे,गावातील लहान सहान कामे करीत, आपला खर्च व घरासाठी मदत करीत, कॉलेजला जाताना जूने पॅरागॉन तळवे नसणारे चपल वापरताना त्याला काहीच वाटत नव्हतं. मित्र मात्र बूट घालून यायचे आणि हा स्लीपर घालून यायचा. आकरावी पास झाल्याचे व बारावी वर्गात नाव असलेचे मित्रा कडून समजले, म्हणून बारावी परीक्षा फॉर्म भरणे करीता महात्मा जोतिबा फुले ज्युनिअर कॉलेज महागाव येथे गेल्यावर शिक्षकांनी नियमित वर्गात येत नसल्याने आम्ही फाँर्म भरणार नाही, असे स्पष्ट सांगितलं. त्यामुळे नाराज होवून, गावी आल्यावर मलिग्रे हायस्कूलचे शिक्षक शिवाजी सावंत यानी कॉलेज मध्ये फोन करून मुलगा प्रामाणिक असून, मागील अनुभव प्रमाणे कमी वेळेत अभ्यास करणारा विद्यार्थी आहे. म्हणून फॉर्म भरायला लावला. त्यामुळे रात्रीचा दिवस करून अभ्यास केला आणि त्रेचाळीस टक्के मार्कांनी बारावी पास झाल्याने पून्हा जबाबदारी वाढली. जिद्द, चिकाटी आणी मेहनत घेत पळण्याचा सराव केला. भारतीय सैनिक भरतीला प्रयत्न सुरू केले. नशिबाने साथ दिल्याने, मिलिटरी मध्ये भरती झाल्यावर ड्रायव्हिंग क्षेत्रात काम करीत असताना बाहेरून पदविचे शिक्षण पूर्ण केले . बदलीमुळे देशाभरात काम करत असताना, पुण्यात दोन गुंठे जागा घेऊन घर बांधले. गावी शेतात बोरवेल मारले.आणि कोरोना काळात भारतीय सैन्यातून रिटायर्ड झाल्यावर, रिकामे राहण्यापेक्षा बारा तास ड्युटीवर वाचमनचे काम केले. यानंतर सुहाना मसाले यांच्याकडे काम करीत असताना, पोलीस भरती साठी प्रयत्न करण्याचे ठरवत असताना योगायोगाने स्पर्धापरीक्षेच्या शिक्षकांनी एमपीएसीचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. फार अवघड आणि कठीण परस्थिती असताना, स्पर्धा परीक्षांच्या कामाला सुरवात केली. यासाठी त्याला एक सातवीत आणी एक नववीत शिकणाऱ्या त्याच्या मुलीनी त्याच्या अभ्यासात मदत केली. सातत्याने अभ्यासात वाचन करीत स्पर्धा परीक्षा देत अखेर एमपीएसी चांगल्या मार्काने धोंडिबा जाधव पास झाला. पुण्यातील सहकार आयुक्त यांच्याकडे सहाय्यक सहकारी अधिकारी म्हणून रूजू झाल्याने केलेल्या कामाचे फळ मिळाले. जिद्द, प्रामाणिक पणा, कष्टाने यश मिळते, यासाठी ग्रामिण भागातील विध्यार्थीनी झोकून देवून अभ्यास करावा, असे आवाहन त्याने यावेळी केले आहे.मनात जिद्द असेल तर परिस्थितीवर मात करीत माणूस यशाला गवसणी घालू शकतो हे धोंडिबाने सिद्ध करून दाखवले आहे. धोंडिबाबत ही माहिती दिली आहे कॉ.संजय घाटगे यांनी.
सेवा सोसायटीचा शिपाई झाला सहकार आयुक्तचा अधिकारी
|