जगभरातील नोटांवर सामान्यतः राष्ट्रपती, पंतप्रधान, राजे-महाराजे किंवा महापुरुषांचे फोटो असतात; परंतु एका देशाने आपल्या आवडत्या क्रिकेटपटूसाठी अनोखा सन्मान राखला आहे. वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार सर फ्रँक वॉरेल हे जगातील एकमेव क्रिकेटपटू आहेत ज्यांचा फोटो चलनाच्या नोटांवर छापला गेला आहे.
बारबाडोस या बेट राष्ट्रातील क्रिकेट संस्कृतीत त्यांचे योगदान इतके मोठे आहे की सेंट्रल बँक ऑफ बारबाडोसने त्यांच्या स्मरणार्थ हा अनोखा मान दिला. वॉरेल हे केवळ एक दिग्गज कर्णधारच नव्हते, तर अत्यंत संयमी, खेळाडूपण जपणारे आणि मानवी मूल्यांचा सन्मान करणारे व्यक्तिमत्व होते. महान ऑलराऊंडर गॅरी सोबर्सप्रमाणेच तेही बारबाडोसचे अभिमानास्पद प्रतिनिधी होते.
फ्रँक वॉरेल यांचे भारताशीही एक खास आणि भावनिक कनेक्शन आहे. 1962 साली वेस्ट इंडिजचा भारत दौरा सुरू असताना एका सामन्यात भारतीय कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे तातडीने ऑपरेशनची आवश्यकता निर्माण झाली, पण रक्ताची कमतरता होती. त्या वेळी कोणताही विचार न करता फ्रँक वॉरेल यांनी स्वतः पुढाकार घेऊन कॉन्ट्रॅक्टर यांना रक्तदान केले. त्या क्षणी ‘विरोधी संघाचा खेळाडू’ नव्हे, तर एक महान मानवतेचा दूत पुढे आला. आजही भारतीय क्रिकेट जगत हा प्रसंग आदराने स्मरते.
फ्रँक वॉरेल यांनी वेस्ट इंडिजसाठी 51 टेस्ट सामने खेळून 49.48 च्या सरासरीने 3,860 धावा केल्या तसेच 69 विकेटही घेतल्या. 208 फर्स्ट क्लास सामन्यांतही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. दुर्दैवाने केवळ 42 व्या वर्षी त्यांचे निधन झाले, परंतु अल्प आयुष्यातही त्यांनी क्रिकेटविश्वाला शिस्त, समंजसपणा आणि नेतृत्वगुणांची अमूल्य देणगी दिली. म्हणूनच आजही बारबाडोसची जनता त्यांच्यावर निस्सीम प्रेम करते, आणि त्यांच्या नोटांवर छापलेला वॉरेल यांचा फोटो त्यांच्यावरील श्रद्धेचा पुरावा आहे.