बातम्या
शहरातील समस्या सोडवण्यासाठी कालबद्ध आराखडा राबवावा – आमदार अमल महाडिक
By nisha patil - 9/24/2025 6:13:00 PM
Share This News:
शहरातील समस्या सोडवण्यासाठी कालबद्ध आराखडा राबवावा – आमदार अमल महाडिक
कोल्हापूर : शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करून तो तातडीने राबवावा, असे निर्देश कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांना दिले.
जवाहर नगर, खणभाग, बिजली चौक व निर्माण चौक परिसरातील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा प्रश्न लवकर मार्गी लागेल, असे प्रशासकांनी बैठकीत सांगितले. उपनगरांमधील मोकळ्या जागा विकसित करण्याचा आराखडा, शहर वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, बंद सिग्नल यंत्रणा सुरू करणे, प्रमुख चौक अतिक्रमणमुक्त करून सुशोभीकरण, तसेच हॉकी स्टेडियम चौक प्रायोगिक तत्त्वावर विकसित करण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या.
नगरोत्थान योजनेतील रस्त्यांची कामे लवकर सुरू करावीत, महानगरपालिका शाळांसाठी स्वतंत्र बजेट हेड तयार करावा, जलतरण तलावात सुविधा वाढवाव्यात, कचरा संकलनासाठी अतिरिक्त टिपर खरेदी करून प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा निवडावी, असेही त्यांनी सांगितले.
भविष्यातील विस्तार लक्षात घेऊन ड्रेनेज, कचरा व पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही महाडिक यांनी दिली. सरस्वती टॉकीज येथील बहुमजली पार्किंगमुळे दिलासा मिळाला असून, अशा पार्किंग सुविधा शहरात इतर ठिकाणी उभारण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पुढील ५० वर्षांचा विचार करून विकास आराखडा तयार करण्याचेही निर्देश आमदार महाडिक यांनी दिले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगररचना विभागाचे एन. एस. पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
शहरातील समस्या सोडवण्यासाठी कालबद्ध आराखडा राबवावा – आमदार अमल महाडिक
|