बातम्या

*एक विवाह असापण.. खूप काही सांगून जाणारा... आगळा आणि वेगळा

A wedding like this too


By Administrator - 6/7/2026 1:35:11 PM
Share This News:



*एक विवाह असापण.. खूप काही सांगून जाणारा... आगळा आणि वेगळा
 

आजरा(हसन तकीलदार):-आजऱ्यातील पेरणोलीपैकी नावलकरवाडी एक छोटीशी वाडी. डोंगराच्या पायथ्याशी एका कोपऱ्यात विसावलेली ही निसर्गसंपन्न नावलकरवाडी. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक विवाह संपन्न झाला. पण हा सोहळा अगदी आगळा वेगळा आणि आदर्श घेण्यासारखा. संदीप ढोकरे याचा विवाह पोळगावच्या शुभांगीशी झाला. मुहूर्त संपताच त्यांनी थेट शेत गाठलं आणि शेतात आई वडीलासोबत पॉवर ट्रिलर आणि डोक्याची नांगरी ओढून आपल्या लग्नाच्या आयुष्याची सुरवात केली. ही सुरवात म्हणजे सौभाग्याची, वैभवाची, संपन्नतेची आणि कष्टाच्या भाकरीची म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
   

शेतकरी पुत्र असलेले संदीप ढोकरे आणि नववीवाहिता शुभांगी यांनी वैवाहिक जीवनाची सुरवात एक प्रेरणादायी आणि आदर्शवत कार्याने सुरु केली. लग्नातील सर्व धार्मिक विधी संपन्न होताच या नवदांपत्याने आपल्या आई वडीलासोबत थेट शेत गाठले आणि पावरट्रिलरने नांगरणी करीत नंतर डोक्याच्या नांगरीने संदिपने नांगरट केली व नवविवाहितेने बीज पेरले. यावेळी ढोकरे यांचे आई वडिलही शेतात उपस्थित होते. आपल्या मुलाने आणि सुनेने लग्नानंतरचा पहिला शुभ आणि आनंदी क्षण शेतीला अर्पण केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमान स्पष्ट झळकत होता. आई वडिलांच्या आशीर्वादाने संदीप आणि शुभांगी यांनी एकत्रित शेतात काम करून कष्टाशी आणि शेतीप्रधान संस्कृतिशी असलेली निष्ठा आपल्या कृतीतून दाखवून दिली.
     

आजच्या आधुनिक युगात अनेक तरुण तरुणी शेतीपासून दूर जाताना दिसतात. नव्या संसाराचा शुभारंभ शेतातून करून या नवदांपत्याने शेती, कष्ट आणि शेतीप्रधान भारतीय संस्कृतीला एक अनोखी सलामी दिली आहे. त्यांनी आपल्या कृतीतून शेती हा केवळ व्यवसाय नसून ती जीवनपद्धती, संस्कार आणि भारतीय संस्कृतीचा स्वाभिमान असल्याचा प्रेरणादायी विचार संपूर्ण समाजव्यवस्थेला दिला आहे. ग्रामीण भागातील युवा युवतीनी आपल्या मातीतल्या संस्काराचा अभिमान बाळगत शेतीशी असलेले नाते दृढ करावे अशी प्रेरणा आजच्या युवा युवतीनी घेतली पाहिजे. आजच्या नववधुला नोकरीवाला नवरा पाहिजे. त्याच्यासोबत भरपूर शेतीवाडी पाहिजे परंतु लग्नानंतर शेतात राबायला नको अशी परिस्थिती आहे. आजच्या धावपळीच्या युगात शेतीशी नातं घट्ट करून आपले जीवन निरोगी, आरोग्यसंपन्न करण्याचा हा एकमेव उपाय आहे. आई वडिलांचे संस्कार, मातीशी असलेली नाळ आणि शेतीवरील प्रेम जपणारेच खरे भारतीय संस्कृती आणि शेतकऱ्यांचे वारसदार ठरतात.


*एक विवाह असापण.. खूप काही सांगून जाणारा... आगळा आणि वेगळा
Total Views: 24