बातम्या
विवेकानंद महाविद्यालयात एड्स जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
By nisha patil - 10/24/2026 10:21:53 PM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयात एड्स जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
कोल्हापूर दि. 24 : विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथील रेड रिबन क्लबच्या वतीने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सी.पी.आर. रुग्णालय, कोल्हापूर यांच्या सहकार्याने शनिवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी पंचगंगा रुग्णालय, कोल्हापूर येथील आयसीटीसी समुपदेशक सौ. सुरेखा अमर जाधव प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही व एड्स यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. एचआयव्हीचा संसर्ग कसा होतो, त्याचा प्रसार कशामुळे होतो, संसर्ग टाळण्यासाठी कोणती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, तसेच या आजाराविषयी समाजात असलेल्या गैरसमजुती दूर करण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन करून त्यांनी योग्य व शास्त्रीय माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, एचआयव्ही/एड्सविषयी असलेला संकोच व भेदभाव दूर करणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव याबाबतचे प्रबोधन केले. कार्यक्रमाचे आयोजन रेड रिबन क्लबच्या नोडल अधिकारी तथा सीटीओ डॉ. नम्रता ए. नरेवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.सी.सी. छात्र प्रतिक्षा जाधव यानी केले तर सुत्रसंचालन सृष्टी सचिन पाटील यांनी केले. आभार आर आर सी नोडल ऑफिसर डॉ. एन. ए .नरेवाडीकर यानी मानले. सदर कार्यक्रमासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, प्रबंधक श्री. धनवडे, कार्यालयीन वृंद यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमासाठी प्रा.एम. पी. गवळी, प्रा. सौ. पी. यु. पाटील, डॉ. ए.जे.पाटील, डॉ. एस. आर. पाटील, मेजर सुनिता भोसले, लेफ्टनंट जे. आर. भरमगोंडा, प्रा.एच.जी.पाटील, एन.सी.सी, एन.एस.एस.चे आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्सविषयी योग्य माहिती मिळावी आणि समाजात जनजागृतीचा संदेश पोहोचावा, या दृष्टीने हा कार्यक्रम उपयुक्त ठरला.
विवेकानंद महाविद्यालयात एड्स जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
|