बातम्या
आजरा महाविद्यालयात बार्टीच्या विविध योजना व जात वैधता प्रक्रियेवर मार्गदर्शन;*
By nisha patil - 2/7/2026 10:51:51 PM
Share This News:
*आजरा महाविद्यालयात बार्टीच्या विविध योजना व जात वैधता प्रक्रियेवर मार्गदर्शन;*
*आजरा(हसन तकीलदार)**:-येथील आजरा महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (बार्टी), कोल्हापूर यांच्या वतीने "बार्टीच्या विविध योजना व जात वैधता (कास्ट व्हॅलिडिटी) प्रक्रिया" या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डी. पी. संकपाळ हे होते. प्रारंभी एम. आर. शिंत्रे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बार्टीच्या प्रतिभा सावंत यांनी बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कौशल्य विकास, संशोधन व इतर विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, पडताळणीची कार्यपद्धती आणि आवश्यक खबरदारी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून उपलब्ध संधींचा प्रभावीपणे उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बी. एम. वायकसकर यांनी जात वैधता प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती देत, कागदपत्रांची अचूकता व पूर्तता ही यशस्वी प्रक्रियेची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य डी. पी. संकपाळ यांनी विद्यार्थ्यांनी अशा मार्गदर्शनपर उपक्रमांचा लाभ घेत आपल्या शैक्षणिक व करिअरच्या वाटचालीसाठी शासनाच्या योजनांचा प्रभावी वापर करावा, असे प्रतिपादन केले. योग्य माहिती, नियोजन आणि वेळेवर केलेली कागदपत्रांची पूर्तता विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. पोतदार, पर्यवेक्षक मनोजकुमार पाटील, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील, प्रवीण कोळी, संदीप देसाई तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. डी. हाक्के यांनी केले, तर पी. एस. संकेश्वरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. मार्गदर्शनपर कार्यक्रमामुळे विद्यार्थी व पालकांना बार्टीच्या विविध योजनांची तसेच जात वैधता प्रक्रियेची उपयुक्त माहिती मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
आजरा महाविद्यालयात बार्टीच्या विविध योजना व जात वैधता प्रक्रियेवर मार्गदर्शन;*
|