बातम्या

ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल आभा शुक्ला यांना ‘वूमन इन एनर्जी अॅण्ड युटिलिटीज’ पुरस्कार

Abha Shukla receives Women in Energy and Utilities


By Administrator - 3/14/2026 1:24:04 PM
Share This News:



ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल आभा शुक्ला यांना ‘वूमन इन एनर्जी अॅण्ड युटिलिटीज’ पुरस्कार

मुंबई, दि. १३ : राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात पर्यावरणपूरक व दीर्घकालीन बदल घडवून आणल्याबद्दल अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांना ‘वूमन इन एनर्जी अॅण्ड युटिलिटीज’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे आयोजित India Smart Utility Week 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेत शुक्रवारी (दि. १३) हा गौरव करण्यात आला.

India Smart Grid Forum यांच्या वतीने आयोजित परिषदेत जगभरातील ऊर्जा तज्ज्ञ सहभागी झाले होते. परिषदेत स्मार्ट वीज व्यवस्थापन, सौर ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, ऊर्जा साठवणूक, आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक ऊर्जा उपाययोजनांवर चर्चा व सादरीकरण करण्यात आले.

राज्यातील ऊर्जा क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅन’ तयार करण्यात आला असून त्याच्या अंमलबजावणीमुळे राज्यात ऊर्जा परिवर्तनाला वेग मिळत आहे. या योजनेतून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना मुबलक, स्वस्त आणि शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात आले.

या योजनेअंतर्गत २०३० पर्यंत राज्यातील वाढती वीज मागणी पूर्ण करण्यासाठी सुमारे ४५ हजार मेगावॅट विजेची भर पडणार असून त्यातील ३८ हजार मेगावॅट हरित ऊर्जा असेल. परिणामी राज्यातील नवीकरणीय ऊर्जेची क्षमता १३ टक्क्यांवरून ५२ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. या प्रकल्पांमुळे सुमारे ३ लाख ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन जवळपास ७ लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

तसेच पुढील पाच वर्षांत वीज खरेदीमध्ये सुमारे ८२ हजार कोटी रुपयांची बचत होणार असून महावितरणच्या वीज खरेदीमध्ये वार्षिक १० हजार कोटी रुपयांची बचत आणि क्रॉस सबसिडीचा सुमारे १३ हजार ५०० कोटी रुपयांचा बोजा कमी होणार आहे. त्यामुळे औद्योगिक व व्यावसायिक वीजदर कमी होण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांना दिवसा व शाश्वत वीजपुरवठा देण्यासाठी १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या विकेंद्रीत सौर प्रकल्पांद्वारे मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 राबविण्यात येत आहे. या योजनेतून १० लाख ९५ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळत असून ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेतून आणखी ८ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.

ऊर्जा क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन आभा शुक्ला यांना ‘वूमन इन एनर्जी अॅण्ड युटिलिटीज’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांच्यावतीने महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रेय पडळकर आणि मुख्य महाव्यवस्थापक (आयटी) अविनाश हावरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.


ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल आभा शुक्ला यांना ‘वूमन इन एनर्जी अॅण्ड युटिलिटीज’ पुरस्कार
Total Views: 7