बातम्या
आबिटकर नॉलेज सिटीची शैक्षणिक वाटचाल नव्या उंचीवर
By nisha patil - 12/6/2026 8:52:58 PM
Share This News:
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत कृषी अभ्यासक्रमांना मान्यता – अध्यक्ष अर्जुन आबिटकर
आबिटकर नॉलेज सिटीची शैक्षणिक वाटचाल नव्या उंचीवर
गारगोटी प्रतिनिधी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या आबिटकर नॉलेज सिटीने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
संस्थेला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) अंतर्गत कृषी अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता प्राप्त झाली असून त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची नवी दारे खुली झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे म्हटले आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, सध्या संस्थेमध्ये इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक (डिप्लोमा), नर्सिंग आणि B.Sc. Agriculture हे अभ्यासक्रम यशस्वीपणे सुरू असून हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडविण्याचे कार्य सुरू आहे. त्यामध्ये आता YCMOU च्या कृषी अभ्यासक्रमांची भर पडल्याने शिक्षण क्षेत्रातील संस्थेची व्याप्ती अधिक व्यापक झाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर म्हणाले, "शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये जावे लागू नये आणि त्यांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. YCMOU च्या कृषी अभ्यासक्रमांमुळे शेतकरी, नोकरदार, उद्योजक तसेच शिक्षणाची इच्छा असलेल्या प्रत्येकाला काम करतानाच शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे."
ते पुढे म्हणाले, "आज कृषी क्षेत्र वेगाने बदलत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, अचूक शेती (Precision Farming), सेंद्रिय शेती, कृषी प्रक्रिया उद्योग आणि कृषी उद्योजकता यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ ग्रामीण युवकांनी घ्यावा आणि रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे बनावे, हीच आमची अपेक्षा आहे."
गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड आणि राधानगरी या तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी ही मान्यता विशेष महत्त्वाची ठरणार आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आता घराजवळच उच्च शिक्षण उपलब्ध होणार असून आर्थिक आणि प्रवासाचा भारही कमी होणार आहे.
आबिटकर नॉलेज सिटीने अल्पावधीतच गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा, अनुभवी प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. YCMOU कृषी अभ्यासक्रमांच्या मान्यतेमुळे संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून ग्रामीण शिक्षणाच्या विकासासाठी हे पाऊल मैलाचा ठरणार आहे.
आबिटकर नॉलेज सिटीची शैक्षणिक वाटचाल नव्या उंचीवर
|