हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मौजे नागाव येथे नागाव ते दक्षिण वाडी कडे जाणाऱ्या राज्यमार्ग क्रमांक १९४-अ च्या रुंदीकरणासह सुधारणा करण्याच्या काँक्रीट रस्ता कामाचा शुभारंभ आज खासदार धैर्यशील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. राज्य पुरवणी अर्थसंकल्पातून मंजूर करण्यात आलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून हे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात आले आहे.
या रस्त्याच्या सुधारणा कामामुळे नागाव आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि टिकाऊ दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे. दैनंदिन वाहतूक, शेतीमाल वाहतूक तसेच स्थानिक आर्थिक हालचालींना या रस्त्यामुळे गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
शुभारंभप्रसंगी वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील मामा, मौजे नागावचे सरपंच व उपसरपंच, तसेच विकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, महिला मंडळाच्या सदस्या आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी खा. धैर्यशील माने यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाबद्दल समाधान व्यक्त करत, गावाच्या प्रगतीसाठी हे काम मैलाचा दगड ठरेल, अशी भावना व्यक्त केली.