विशेष बातम्या
दर्जाहीन रस्ते कामांवर कारवाई — चार उपशहर अभियंत्यांची वेतनवाढ रोखली!
By nisha patil - 8/11/2025 3:57:00 PM
Share This News:
दर्जाहीन रस्ते कामांवर कारवाई — चार उपशहर अभियंत्यांची वेतनवाढ रोखली!
कोल्हापूर : शहरातील रस्त्यांची कामे दर्जेदार न केल्याबद्दल महापालिकेने कठोर कारवाई केली आहे. उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर आणि निवास पोवार यांच्या एक वेतनवाढीवर तात्पुरती रोक घालण्याचे आदेश महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिले.
गेल्या महिन्यातच या चौघांना “कारवाई का करू नये?” अशी नोटीस देण्यात आली होती. शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाला ५० लाख रुपये, म्हणजेच एकूण दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. या निधीतून पॅचवर्कची कामे करण्याचे आदेश होते. मात्र, कामावर योग्य नियंत्रण व गुणवत्तेची देखरेख न केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, शहरातील इतर कामांबाबतही हालचाल सुरू आहे. एनकॅपमधून परीख पुलासाठी अडीच कोटी रुपये, तसेच फुलेवाडी रिंगरोडसाठी दीड कोटी रुपये मंजूर झाले असून, त्याची निविदा अंतिम टप्प्यात आहे. यापूर्वीही रिंगरोडवरील काही कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, उर्वरित रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या स्वनिधीतून चारही विभागीय कार्यालयांना आणखी दोन कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे आणि ही सर्व कामे पुढील दोन आठवड्यांत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित शहर अभियंत्यांना देण्यात आले आहेत.
दर्जाहीन रस्ते कामांवर कारवाई — चार उपशहर अभियंत्यांची वेतनवाढ रोखली!
|