बातम्या
कोल्हापूरात कुख्यात ‘गब्बर गँग’वर मोक्का अंतर्गत कारवाई — आयजी सुनिल फुलारी यांची मंजुरी
By nisha patil - 4/10/2025 3:14:42 PM
Share This News:
कोल्हापूरात कुख्यात ‘गब्बर गँग’वर मोक्का अंतर्गत कारवाई — आयजी सुनिल फुलारी यांची मंजुरी
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात ‘गब्बर गँग’ विरोधात अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत या टोळीविरुद्ध कारवाईस विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मंजुरी दिली आहे.
शाहुपूरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४६९/२०२५ प्रमाणे दाखल गुन्ह्याची फिर्याद श्रीनाथ गंगाराम कुचकोरवी (वय २८, रा. कावळानाका, कोल्हापूर) यांनी दिली होती. फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. २१ जून २०२५ रोजी दुपारी गब्बर गँगच्या सदस्यांनी नागाळापार्क परिसरात त्यांच्यावर हल्ला करून प्राणघातक तलवारीने वार केला होता.
या गुन्ह्यात गँगचा प्रमुख आदित्य उर्फ गब्बर अमर सुर्यवंशी (रा. केव्हीज पार्क, नागाळापार्क) याच्यासह अनिकेत अमर सुर्यवंशी, तुषार सिध्दु कुमठे, सुजल युवराज ढेरे, ओंकार कुमार समुद्रे, प्रतिक विजय नागांवकर आणि एक विधी संघर्षित बालक यांचा समावेश आहे.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी तपासादरम्यान या टोळीचा विस्तृत गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आढावा घेतला. या गँगचे सदस्य यापूर्वी ‘सुर्यवंशी गँग’ म्हणूनही कुप्रसिद्ध होते. त्यांच्या विरोधात जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, अवैध जुगार अशा २१ गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले.
त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार आणि शहर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील यांना मोक्का कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी तयार केलेला प्रस्ताव तपासून विशेष आयजी सुनिल फुलारी यांनी मोका कारवाईस मंजुरी दिली.
सदर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गब्बर गँग किंवा इतर अशा संघटित गुन्हेगारी गटांच्या अत्याचारास बळी पडलेल्या व्यक्तींनी निर्भयपणे स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.
या कारवाईत मा. पोलीस अधीक्षक योगेश कुमार, डॉ. बी. धिरजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, पो.नि. संतोष डोके, पो.नि. रविंद्र कळमकर, पो.ह. संजय जाधव, पो.ह. इनामदार, आणि सहा. फौजदार सचिन सुर्याजी पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
ही मोका कारवाईमुळे कोल्हापूर पोलीस दलाने पुन्हा एकदा संघटित गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिकेचा संदेश दिला आहे.
कोल्हापूरात कुख्यात ‘गब्बर गँग’वर मोक्का अंतर्गत कारवाई — आयजी सुनिल फुलारी यांची मंजुरी
|