राजकीय
*आजरा नगरपंचायतीच्या मासिक सभेत प्रशासनाला घरचा आहेर
By nisha patil - 7/29/2026 11:34:26 PM
Share This News:
*आजरा नगरपंचायतीच्या मासिक सभेत प्रशासनाला घरचा आहेर
*सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रशासनाला धरले धारेवर
*आजरा(हसन तकीलदार):- आजरा नगरपंचायतीच्या मासिक सभेत यावेळी विकासकामांपेक्षा प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचीच अधिक चर्चा रंगली. विरोधी आणि सत्ताधारी नगरसेवकांच्या संतापाने सभागृह अक्षरशः दणाणून गेले. अपूर्ण कामे, नागरिकांच्या तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष, कोट्यवधी रुपयांच्या योजनांची रखडलेली अंमलबजावणी आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवरून प्रशासनाला चांगलेच फैलावर घेत, "काम करायचे नसेल तर खुर्चा रिकाम्या करा; अन्यथा चौकशी करून निलंबनाची मागणी करू असा इशाराच जणू नगरसेवकांनी दिला.
नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत प्रशासनाला एकापाठोपाठ एक प्रश्नांचा भडीमार करीत प्रश्नांनी घेरण्यात आले. नगरसेवक अभिषेक शिंपी आणि परेश पोतदार यांनी लाखो रुपये खर्चून उभारलेला सौरऊर्जा प्रकल्प अद्याप प्रभावीपणे वापरात नसताना नगरपंचायतीवर वीजबिलाचा वाढता बोजा का?असा सवाल उपस्थित केला. जनतेच्या कररूपाने जमा झालेल्या पैशांचा असा अपव्यय अस्वीकार्य असल्याचे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सोलर प्रकल्प कोट्यावधी रुपये खर्चून उभारला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प मोडकळीस आला आहे. त्याची देखरेख करून तो कार्यन्वयीत करणे प्रशासनाची जबाबदारी होती. या नुकसानीस जबाबदार कोण? याची जबाबदारी निश्चित करून जे याच्या नुकसानीला जबाबदार आहे त्यांच्याकडून याची वसुली झाली पाहिजे.अशी मागणी केली.अभिषेक शिंपी पुढे म्हणाले की, कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट करावयाची असेल तर तज्ञाची नेमणूक करून एक प्रोजेक्ट तयार करणे गरजेचे आहे.
त्यासाठी तांत्रिक सल्लागार घेण्याची सूचना केली. विकासकामाना व्यत्यय येऊ नये म्हणून आम्ही विरोध करीत नाही. तरीसुद्धा वर्कऑर्डरिला उशीर का होतो? नगरपंचायतीचा विश्वास शून्य झाला आहे. अग्निशमनसारख्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत दिले जात नाहीत, दुकानांची बिले वेळेत मिळत नसल्याची दुकानदारांची तक्रार असल्याने दुकानदार उभे करून घेत नाहीत त्यामुळे अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून कामे करावीत. सभागृहात आश्वासनांची खैरात आणि बाहेर मात्र फाइलांची दिरंगाई, हा प्रकार आता चालणार नाही. नागरिकांच्या प्रश्नांशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात चौकशीची मागणी करण्याशिवाय पर्याय उरणार नाही अशा शब्दांत शिंपी यांनी प्रशासनाला इशारा दिला.
नगरसेवक परेश पोतदार यांनीही संतप्त भावना व्यक्त करत, "नागरिकांसाठी लढाही आम्हीच द्यायचा आणि उत्तरपण आम्हीच द्यायचे तर मग प्रशासनाची जबाबदारी नेमकी काय ?" असा सवाल उपस्थित केला. "दरवेळी जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे .त्याचप्रमाणे रामतीर्थवरील धर्मशाळेची दुरुस्ती करून अद्यावत प्रसाधन गृहे तयार करण्यासाठी उपलब्ध निधीचा वापर करण्याची सूचना यावेळी पोतदार यांनी मांडली.
ग्रामपंचायतच्या दप्तरातून अनेक मूळ कागदपत्रे गायब होत असल्याचा गंभीर आरोप मासिक सभेत करण्यात आला. विशेष म्हणजे या आरोपाचे प्रशासनाकडून ठोस खंडण करण्यात आले नाही. त्यामुळे दप्तरातील नोंदींच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली. याचवेळी प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे नागरिकांसमोर वारंवार स्पष्टीकरण द्यावे लागत असल्याची खंत व्यक्त करत नगरसेवक परेश पोतदार यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. "अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारली नाही तर जनतेच्या रोषाला आम्ही किती दिवस सामोरे जायचे? अशी परिस्थिती असेल तर झक मारली आणि नगरसेवक झालो, असेच म्हणावे लागेल.नगरसेवक झाल्याचा आनंद नाही तर पश्चाताप होतोय असे म्हणत त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली .
पावसाळा संपत आला तरी कर्मचाऱ्यांना गणवेश, रेनकोट आणि आवश्यक साहित्य दिले नसल्याचा मुद्दा नगरसेवक निसार लाडजी यांनी उपस्थित केला.नगरसेवकाच्या घरासमोरील कचरा उठाव होत नसेल तर सर्वसामान्य जनतेचे काय? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.नगरसेविका पुनम लिचम यांनी घनकचरा वर्गीकरणाच्या कामाचा आढावा मागितला, तर विक्रम पटेकर यांनी प्रत्येक महिन्याच्या खर्चाचा तपशील सभागृहासमोर ठेवण्याची मागणी केली. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या टाकीतून सतत पाणी ओव्हरफ्लो होत असल्याने भराव वाहून जात असून मोठा धोका निर्माण झाल्याची बाब नगरसेवक परशुराम बामणे यांनी निदर्शनास आणून दिली. अनेकदा सूचना करूनही प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. बामणे भाऊजी पुढे म्हणाले की, अधिकारी ऐकत नसतील तर आंदोलनाशिवाय पर्याय नसतो, आंदोलन झाल्यावर अधिकारी कामे करण्याचा फार्स करतात. तात्पुरती कामे होतात, हीच कामे जर वेळेत झाली तर आम्हाला आंदोलने करण्याची गरजच काय? वेळेत कामे होत नसल्याने आम्हाला आंदोलने करावी लागतात. जनतेच्या हितासाठी आम्ही आंदोलने करणार त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोणीही पाठीशी घालू नये असेही सांगिलते.सौ.निशात समीर चांद यांनी सार्वजनिक ठिकाणी बाजारपेठ, मंदिर, मस्जिद अशा ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करणेबाबत लेखी पत्र दिले.सभेदरम्यान असीफ पटेल, अनिकेत चराटी,रेश्मा नौशाद बुडडेखान यांच्यासह अनेक नगरसेवकांनी विविध विषयांवर प्रशासनाला धारेवर धरत कामकाजातील त्रुटींवर बोट ठेवले.
निहाल नाईकवाडी यांनी नोटीसीचे वाचन केले.
सभेला मुख्याधिकारी सुरज सुर्वे, अमर कांबळे(आरोग्य विभाग) , मानसी कदम(पाणीपुरवठा विभाग ),प्रवीण बैले(बांधकाम विभाग ),उपनगराध्यक्षा पूजा डोंगरे, आसिफभाई सोनेखान, डॉ. स्मिता कुंभार, श्रीमती कलावती कांबळे,डॉ. इंद्रजित देसाई, सौ. रहिमतबी खेडेकर, आसावरी खेडेकर, अश्विनी चौहाण आदिसह कर्मचारी उपस्थित होते.
*आजरा नगरपंचायतीच्या मासिक सभेत प्रशासनाला घरचा आहेर
|