राजकीय

महानगरपालिकेच्या स्वच्छता कामकाजावर प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांचा कडक आढावा; निरीक्षकांना सुधारणा करण्याचा इशारा

Administrator K Manjulaxmis strict review


By nisha patil - 11/22/2025 5:23:09 PM
Share This News:



महानगरपालिकेच्या स्वच्छता कामकाजावर प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांचा कडक आढावा; निरीक्षकांना सुधारणा करण्याचा इशारा

कोल्हापूर, दि. २२ : महानगरपालिकेच्या आरोग्य स्वच्छता विभागातील कामकाजाचा आज प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी आयुक्त कार्यालयात आढावा घेतला. शहरातील वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेसंदर्भात कडक सूचना देत, “चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान, पण दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई”, असा स्पष्ट इशारा त्यांनी सर्व आरोग्य निरीक्षकांना दिला.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, सहायक आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर तसेच सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला प्रशासकांनी प्रत्येक निरीक्षकांकडून त्यांच्या प्रभागातील स्वच्छतेची स्थिती व आव्हाने जाणून घेतली.

पुईखडी कचरा प्रकल्पाची क्षमता वाढवण्याचे निर्देश

पुईखडीतील ५ टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची माहिती घेताना, त्याची क्षमता वाढवण्यासाठी अतिरिक्त जागा व नवीन उपकरणांची तातडीने व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले.

हॉटेल वेस्ट व मार्केट स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा

शहरातील हॉटेल वेस्ट संकलनासाठी स्वतंत्र विभागीय आरोग्य निरीक्षक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्केटमधील कचरा संकलनाची जबाबदारी त्या-त्या परिसरातील आरोग्य निरीक्षकांवर सोपवण्यात येणार आहे. जुन्या वॉर्डनिहाय नियोजनाऐवजी सर्व निरीक्षकांना स्वतंत्र जबाबदाऱ्या देऊन तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त अडसूळ यांनी दिले.

भटके कुत्रे, दंडात्मक कारवाई आणि जनजागृतीवर भर

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या तक्रारींसंदर्भात डॉग स्क्वॉडच्या शस्त्रक्रियेचे अद्ययावत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई, त्यांचे फोटो सार्वजनिकपणे प्रदर्शित करणे आणि वाहनातून कचरा टाकणाऱ्यांची छायाचित्रे आरटीओकडे पाठवून परवान्यावर कारवाई— असे स्पष्ट निर्देश प्रशासकांनी दिले.

नवीन वाहने आणि सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीला गती

आरोग्य विभागाला लवकरच नवीन कचरा वहन वाहने मिळणार असून कचरा उठाव अधिक प्रभावी करावा, असे प्रशासकांनी सांगितले. शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाला २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून आज सायंकाळपर्यंत इस्टीमेट सादर करण्याचे आदेश दिले.

उद्यान, रंकाळा परिसर आणि स्मशानभूमी सुधारणा

शहरातील उद्यानांसाठी स्वतंत्र माळीची नियुक्ती, रंकाळा परिसरात वाढीव स्वच्छता कर्मचारी, कटींग मशीन खरेदी, ड्रेनेज विभागासाठी रॉडींग मशीन खरेदीच्या सूचना देण्यात आल्या. स्मशानभूमींमध्ये आवश्यक साहित्याची तात्काळ खरेदी, स्टोरेज व इतर सुविधांवर आजच कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले.

प्रशासकांच्या या बैठकीत स्वच्छता यंत्रणेतील सर्व विभागांचे कामकाज वेगाने आणि काटेकोरपणे सुधारावे, असा ठाम संदेश देण्यात आला.


महानगरपालिकेच्या स्वच्छता कामकाजावर प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांचा कडक आढावा; निरीक्षकांना सुधारणा करण्याचा इशारा
Total Views: 29